*दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या विषयावर कार्यशाळा*
दापोली शिक्षण संस्था संचालित दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स महाविद्यालयात दि. 24 आणि 25 जून 2024 रोजी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळा महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठ आणि यू जी सी च्या मालवीय मिशन टीचर्स ट्रेनिंग सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, संस्थासंचालक आणि सेवाभावी संस्था यांच्यासाठी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाविषयी जनजागृती करण्यासाठी आयोजित करण्यात आली आहे.
या कार्यशाळेत पहिल्या दिवशी प्राध्यापक, विद्यार्थी आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी तीन स्वतंत्र सत्र होतील तर दुसऱ्या दिवशी संस्था संचालक, प्राचार्य, उपप्राचार्य, पालक आणि सेवाभावी संस्था, उद्योजक इ. साठी तीन स्वतंत्र सत्रे घेतली जातील. कार्यशाळेसाठी मार्गदर्शक म्हणून मानव्य शास्त्र विभागाचे डीन डॉ. अनिल सिंह, मानव्य शास्त्र विभागाच्या सहयोगी डीन डॉ सुचित्रा नाईक आणि डॉ. मनीषा कर्णे, वाणिज्य विभागाच्या डीन डॉ. किशोरी भगत, सेंट झेवियर्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. राजेंद्र शिंदे, मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्सचे डॉ. हिरेन दंड इ. मान्यवर लाभणार आहेत. तरी या कार्यशाळेसाठी दापोली परिसरातील सर्व महाविद्यालयांतील कर्मचारी, विद्यार्थी आणि संस्था संचालक अपेक्षित असून त्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे आणि उपप्राचार्य डॉ. घनश्याम साठे यांनी केले आहे.