वाचन दिना निमित्त दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स कॉलेजमध्ये ‘ उन्नतिसाठी वाचन ‘ हे वेबिनार उत्साहात संपन्न
दापोली एज्युकेशन सोसायटी संचलित दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स कॉलेजच्या प्रो.जी.बी. कुलकर्णी सेंट्रल लायब्ररी कडून वाचन दिनाचे औचित्य साधून१९ जुन २०२१ रोजी सकाळी 11 ते १२.३० या वेळेत ऑनलाइन वेबिनार चे आयोजन करण्यात आले होते. ‘ उन्नतीसाठी वाचन ‘ असा या कार्यक्रमाचा अभिनव विषय होता.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाच्या ग्रंथपाल कीर्ती परचुरे यांनी वाचन दिना संबंधी माहिती देताना असे सांगितले की, केरळ मधील श्री. पी. एन. पणिक्कर यांनी केरळमध्ये स्थापन केलेल्या जवळपास ६००० ग्रंथालयांचे जाळे आणि त्यांनी गावोगाव फिरून केलेली वाचनासंबंधीची जनजागृती अशा या व्यापक कार्याचा गौरव म्हणून देशभर हा दिवस वाचन दिन म्हणून साजरा केला जातो.
या वेबिनार मध्ये प्रा. कैलास गांधी, प्रा. नंदा जगताप, प्रा. मुग्धा कर्वे , प्रा. ऋजुता जोशी यांनी व्याख्याते म्हणून सहभाग घेतला. प्रा. कैलास गांधी यांनी वेगवेगळ्या कविता व शेर-ओ- शायरी असे संदर्भ देत, वाचन आपल्याला किती आनंद देतं आणि सध्याच्या करोना काळात कसा आपल्याला हुरुप देऊ शकतं याचं विवेचन केलं.
प्रा. नंदा जगताप यांनी MPSC सारख्या स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारीसाठी वर्तमानपत्र, क्रमिक पुस्तके व संदर्भ पुस्तकांचे वाचन किती गरजेचे आहे याचे विवेचन करून वेगवेगळ्या विषयांसाठी आवश्यक असणाऱ्या पुस्तकांची यादीच विद्यार्थ्यांसमोर सादर केली. तसेच कोणत्या टप्प्यावर कोणत्या पुस्तकांचे वाचन करायला हवे, याचे मार्गदर्शनही केले.
प्रा. ऋजुता जोशी यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन द्वारे ‘ बिझनेस सुत्र ‘ या लेखक देवदत्त पटनाईक यांच्या पुस्तकाचे रसग्रहण करून हे पुस्तक जुन्या प्रतीकांना नवीन संकल्पनांची कशाप्रकारे जोडते याचे विवेचन केले.
प्रा. मुग्धा कर्वे यांनी या वेबिनारमध्ये ‘ आय डेअर ‘ या किरण बेदी यांच्या पुस्तकावर बोलताना भारतीय पोलिस सेवेत दाखल होणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी म्हणून किरण बेदी यांचा संघर्षमय प्रवास, नोकरीतील जबाबदाऱ्या सांभाळताना येणारे अडथळे आणि त्यातूनच पोलादाप्रमाणे बनत गेलेलं त्यांचं व्यक्तिमत्त्व याचा सुंदर वेध घेतला. न्यायनिष्ठ आणि सन्माननीय पोलीस अधिकारी म्हणून त्यांनी निर्माण केलेल्या स्वतःची ओळखीतुनच पुढे अनेक स्त्रियांना नवीन वाटा निवडण्याची प्रेरणा मिळाली हे ही त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमास विद्यार्थी व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांनी बहुसंख्येने उपस्थित राहुन उत्सफुर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमासाठी प्राचार्य संदेश जगदाळे यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाच्या ग्रंथपाल श्रीमती कीर्ती परचुरे यांनी केले तसेच याप्रसंगी प्रा. सदानंद डोंगरे आणि सहाय्यकांनी तांत्रिक बाबींसाठी मौलिक सहाय्य केले.