दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स कॉलेज मध्ये रॅगिंग प्रतिबंधक कायद्याविषयी मार्गदर्शन…
दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स कॉलेज मध्ये रॅगिंग प्रतिबंधक कायद्याविषयी मार्गदर्शन
दापोली शिक्षण संस्था संचालित दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि अँटी रॅगिंग सेल यांच्या संयुक्त विद्यमाने आणि दापोली तालुका विधी सेवा समिती यांच्या सहकार्याने महाविद्यालयाच्या सेमिनार हॉल मध्ये दि. 22/08/23 रोजी रॅगिंग प्रतिबंधक कायदा आणि विद्यार्थ्यांशी संबंधित इतर कायद्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. त्यासाठी मार्गदर्शक म्हणून दापोली कोर्टाचे न्यायाधीश एम. के. शिंदे आणि ॲडवोकेट कमलेश व्ही. लिमये लाभले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोर्टाचे वरिष्ठ लिपिक श्री. पी. व्ही. तेरेदेसाई यांनी केले. सर्वसामान्यांना न्यायदानाची माहिती देणे हे तालुका विधी सेवा समितीचे काम असल्याचे त्यांनी सांगितले.
ॲडवोकेट लिमये यांनी रॅगिंग हा गुन्हा असून त्यासाठी कारावास आणि दंड याबरोबरच दोन वर्ष कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश न मिळणे यासारख्या शिक्षा असल्याचे सांगून विद्यार्थ्यांनी अशा गोष्टी कुठे होत असल्यास त्या वेळीच महाविद्यालयाच्या प्राध्यापकांच्या लक्षात आणून देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले. न्यायमूर्ती शिंदे यांनी विद्यार्थ्यांनी सतत दक्ष असणे आवश्यक असले पाहिजे असे सांगितले. विद्यार्थ्यांचे बोलणे, वागणे, समाज माध्यमांवर व्यक्त होणे यातून आपण कोणता कायदा मोडत नाही ना याचे भान बाळगले पाहिजे. सध्याच्या तरुणांना अनेक माध्यमातून ज्ञान मिळते पण योग्य ज्ञान पारखून ते अमलात आणणे गरजेचे असते आणि ते विद्यार्थ्यांनी करावे असे त्यांनी मांडले. यावेळी महाविद्यालयाच्या पंचवीस वर्षाच्या इतिहासात रॅगिंगच्या केसची एकही घटना नाही याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
या कार्यक्रमात काही दिवसापूर्वी महाविद्यालयात घेतलेल्या रॅगिंग विरोधी पोस्टर स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना श्री. शिंदे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. यामध्ये झैनाब ऐनरकर हिला प्रथम तर आर्या घोडे हिला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. श्रेयस राऊत आणि सदफ गोठेकर यांना संयुक्त तृतीय क्रमांक मिळाला तर ओम साळवी याला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख डॉ. मनोज लाड आणि प्रा. अजिंक्य मुलुख, अँटी रॅगिंग समितीचे सर्व सदस्य आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. तेजस मेहता यांनी केले.