दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स कॉलेजमध्ये डीइएस -इन्स्पायर कॅम्प उत्साहात संपन्न
दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीही दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित डीइएस -इन्स्पायर कॅम्पचे आयोजन दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स महाविद्यालयात करण्यात आले. हे शिबिर 6 जानेवारी ते 10 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आले.
मूलभूत विज्ञानाची गोडी विद्यार्थ्यांना लागावी, त्यामध्ये उच्च शिक्षण घेऊन संशोधनामध्ये त्यांनी आपले योगदान द्यावे आणि आपल्या देशाच्या प्रगतीमध्ये आपला मोलाचा सहभाग द्यावा या हेतूने दरवर्षी कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञानाच्या विद्यार्थ्यांसाठी दापोली एज्युकेशन सोसायटी आणि दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स महाविद्यालय या शिबिराचे आयोजन करीत असते.
या वर्षी या शिबिराचे उदघाटन उद्योजक निलेश कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दापोली एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. विनोद जोशी, विश्वस्त श्री. समीर गांधी, प्रा. अभय देवधर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे इ. उपस्थित होते.
या शिबिरामध्ये प्रा. अशोक रुपनर यांनी मेकिंग ऑफ द सायंटिफिक मॉडेल या विषयावर विविध शास्त्रीय उपकरणे कशी करावीत याचे मार्गदर्शन करून ती विद्यार्थ्यांकडून करून घेतली.
डॉ. पद्मनाथ पोद्दार यांनी फंडामेंटल ऑफ फिजिक्स या विषयावर भौतिकशास्त्रातील महत्त्वाच्या विषयांवर सोप्या शब्दात मार्गदर्शन केले तर डॉ. श्रीनाथ कवडे यांनी पश्चिमी घाटातील जैव विविधतेची माहिती सांगून त्याचे महत्त्व विशद केले. प्रा. सदानंद डोंगरे यांनी इंटरनेट ऑफ थिंग्स या सध्याच्या काळातील महत्त्वाच्या विषयावर अत्यंत उपयुक्त माहिती सांगून विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले. प्रा. जान्हवी दिवेकर यांनी स्कोप ऑफ द मायक्रोबायोलॉजी या विषयावरच्या व्याख्यानातून सूक्ष्मजीवशास्त्र या विषयामध्ये असलेल्या विविध संधी विषयी माहिती विद्यार्थ्यांना करून दिली. डॉ. नंदा जगताप रिप्रोडक्टिव्ह फिजिओलॉजी या विषयावरील व्याख्यानातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर डी. आर. डी. ओ.,पुणे संस्थेचे डायरेक्टर डॉ. मकरंद जोशी यांनी डिफेन्स टेक्नॉलॉजी या थोड्या वेगळ्याच विषयावर विद्यार्थ्यांना माहिती देऊन मार्गदर्शन केले. डॉ. निवास देसाई यांनी मिरॅकल्स ऑफ बॉटनी या विषयावर व्याख्यान देताना निसर्गातील विषेशकरून वनस्पती सृष्टीतील चमकृतीपूर्ण गोष्टीची विद्यार्थ्यांना ओळख करून दिली. डॉ. रश्मी ताम्हणकर यांनी बेसिक कन्सेप्ट इन मॅथेमॅटिक्स या विषयावर मार्गदर्शन करताना गणितातील अनेक गमती जमती सहजपणे विशद केल्या. प्रा. अजित कानशिडे यांनी फॅशनेटिंग केमिस्ट्री या विषयावरून विद्यार्थ्यांना रसायन शास्त्राचे महत्व आणि गरज यांची माहिती दिली.
या व्याख्यानांबरोबरच दररोज दुपारी विद्यार्थ्यांकडून रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, संगणकशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र इत्यादी विषयांवरच्या विविध प्रयोगांचे प्रात्यक्षिक करून घेण्यात आले.
या शिबिराचा लाभ सुमारे 160 विद्यार्थ्यांनी घेतला आणि शिबिरविषयी समाधान व्यक्त केले.
सदर शिबिराचा समारोप समारंभ 10 जानेवारीला दुपारी चार वाजता झाला. याप्रसंगी बालरोगतज्ज्ञ डॉक्टर अनिरुद्ध फडके प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना जीवनामध्ये कसे वागावे या संदर्भात मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास दापोली एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन डॉ. प्रसाद करमरकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे उपस्थित होते. इन्स्पायर कॅम्प यशस्वी करण्यासाठी इन्स्पायर कॅम्पचे समन्वयक प्रा. दिपाली नागवेकर, प्रा. शंतनू कदम, प्रा. विश्वेश जोशी, डॉ. बापू यमगर प्रा.नेत्रांजली महाडिक यांनी विशेष प्रयत्न केले.