दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची आविष्कार संशोधन स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी
मुंबई विद्यापीठ दरवर्षी आविष्कार संशोधन स्पर्धे द्वारे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना संशोधन करण्यास प्रेरित करत असते. यावर्षी दापोली शिक्षण संस्था संचालित दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स महाविद्यालयाने जिल्हास्तरीय राऊंडमधे 7 संशोधन प्रकल्पांसाठी नामांकन मिळवून आपला ठसा उमटवला. या यशामुळे दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स महाविद्यालयाने या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.
3 डिसेंबर रोजी खेडमध्ये झालेल्या या स्पर्धेत मूलभूत विज्ञान (पदवीपूर्व विद्यार्थी) या विभागात आयेशा खोत आणि ऋतुजा करमरकर तसेच सिमरन दळवी आणि सानिया बालगुडे यांच्या संशोधन प्रकल्पांची विद्यापीठ स्तरावरच्या पुढच्या राऊंड साठी निवड झाली. ह्या विद्यार्थिनींना प्रा. संतोष मराठे आणि प्रा. निशिगंधा बंदरकर यांनी अनुक्रमे मार्गदर्शन केले.
वाणिज्य विभागाच्या पदवीपूर्व विभागातही सोबिया हवा आणि तहजीबा महालदार तसेच सानिका जाधव आणि साहिल जाधव यांच्या प्रकल्पांनी आपला ठसा उमटवला आणि पुढच्या राऊंडमधील आपला प्रवेश निश्चित केला. या विद्यार्थ्यांना अनुक्रमे प्रा. सिद्धी साळगावकर आणि प्रा. भाग्यश्री राजपुरकर यांचे मार्गदर्शन लाभले.
पदव्युत्तर गटात मूलभूत विज्ञान विभागात अनुष्का कोवळे, मुब्बशिरा गावगावकर आणि प्रीती काटकर या विद्यार्थिनींनी प्रा. विजय गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केलेल्या प्रकल्पाची निवड झाली तर याच गटात कृषी विभागात तोलकर सानिया या विद्यार्थिनीने प्रा. दिपाली नागवेकर यांच्या मार्गदर्शनात आणि सदफ गोठेकर व समिन उपाधेय यांनी डॉ. नंदा जगताप यांच्या मार्गदर्शनात सादर केलेले संशोधन प्रकल्प लक्षणीय ठरले.
हे सर्व संशोधन प्रकल्प पुढे विद्यापीठ स्तरावर होणाऱ्या नंतरच्या राऊंड मध्ये निवडले असून तेथील स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.
महाविद्यालयातील डॉ. बापू यमगर यांनी आविष्कार समन्वयक म्हणून स्पर्धेच्या महाविद्यालयातील आयोजनाची जबाबदारी पार पाडली.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या मार्गदर्शकांचे दापोली शिक्षण संस्थेचे संचालक तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे, उपप्राचार्य डॉ. घनश्याम साठे आणि सर्व प्राध्यापकांनी अभिनंदन केले आणि पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.