दापोली लाईफ लाइन – आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा
दापोली शिक्षण संस्था व दापोली लाईफ लाईन संघटना आयोजित ‘आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेचा’ कार्यक्रम दिनांक १ ऑक्टोबर रोजी दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजच्या सभागृहात पार पडला. याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष श्री. माजलेकर, संचालक, दापोली लाईफ लाइन संघटनेचे सर्व प्रमुख कार्यकर्ते आणि सह्याद्री ट्रेकर्स, महाबळेश्वर ट्रेकर्स, खेड ट्रेकर्स या संघांचे सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुमंत जुवेकर यांनी केले.
दापोली लाईफ लाईन या संघटनेबद्दल सांगताना श्री. अविनाश मयेकर म्हणाले की, आंबेनळी घाटात झालेल्या दुर्घटने पासुन प्रेरित होऊन आम्ही दुर्घटनास्थळी कार्य करणाऱ्या विविध बचाव दलांना आवश्यकतेनुसार विनामुल्य वस्तुंचा पुरवठा करण्याचे काम करणार आहोत. तुटपुंज्या साधन सामग्रीतही जे बचाव दल सतत कशाचीही पर्वा न करता काम करतात त्यांना मदत करणे हा या संघटनेचा मुख्य हेतु आहे.
या कार्यासाठी त्यांना एकुण ६३ देणगीदार मिळाले. तसेच आपत्ती व्यवस्थापनाचा एक संघ विद्यार्थ्यांमधुन तयार व्हावा त्यासाठी ‘दापोली सायन्स कॉलेजची’ निवड करण्यात आलेली आहे. दुर्घटना स्थळी प्रत्यक्ष जाऊन हा संघ बचाव दलांना मदत करेल. या संकल्पने मागे प्रामुख्याने ए. जी हायस्कुलच्या विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा सौ. देशमुख, श्री. अविनाश मयेकर, सुमंत जुवेकर, राजेश चितळे, दिनेश वऱ्हाडे यांचा सहभाग आहे.
‘आपत्ती व्यवस्थापन संघ’ तयार करणारे ‘दापोली सायन्स कॉलेज’ हे पहिले महाविद्यालय ठरणार आहे. विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी सह्याद्री व महाबळेश्वर ट्रेकर्स यांनी घेतलेली आहे. ए. जी हायस्कुलच्या विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा सौ. देशमुख याप्रसंगी म्हणाल्या की श्रीराम बलवर्धक मंडळ यांनी दापोली लाइफ लाईन संघटनेला त्वरित बँक खाते उघडुन देऊन संस्थात्मक सहकार्य केले. दापोली सायन्स कॉलेजचे प्राचार्य श्री. संदेश जगदाळे यांनी ‘हा आपत्ती व्यवस्थापनाचा उपक्रम समर्थपणे चालवु ‘ असे सर्वांना सांगितले.
सह्याद्री ट्रेकर्सचे प्रमुख श्री. संजय पार्टे यांनी याप्रसंगी आंबेनळी घाटातील दुर्घटना, मृत देहांना बाहेर काढताना आलेली विविध आव्हाने, सलग दोन दिवस चाललेले बचाव कार्य यांचे हृदयद्रावक अनुभव कथन केले. यावरुन अतिशय तुटपुंज्या साधन सामग्रीत आपला जीव धोक्यात घालून विविध बचाव दल आपल्याला मदत करतात ही गोष्ट प्रकर्षाने जाणवली. ‘ आपत्ती व्यवस्थापन उपलब्ध असलेल्या वस्तुं मधुन करता यायला पाहिजे ‘, हा संदेश त्यांनी दिला.
नगरसेवक नंदेश खेडेकर यांनी आपले अनुभव कथन केलेच पण त्याचबरोबर प्रथमोपचारांच्या बाबतीतही माहिती दिली. ‘ पिडीत रुग्णाला जर गोल्डन अवर्स मध्ये रुग्णालयात नेले तर त्याचा जीव वाचु शकतो ‘ हा महत्त्वाचा संदेश त्यांनी दिला. खेड ट्रेकर्स यांच्या सदस्यांनी सांगितले की आम्ही देखील सह्याद्री व महाबळेश्वर ट्रेकर्स यांच्या कडुन प्रेरणा घेऊन बचाब दल उभा केला आम्ही गेले २० वर्ष मोफत ॲम्बुलन्स सेवा देत आहोत.
कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे उपाध्यक्ष श्री. माजलेकर यांच्या हस्ते व्यवस्थापन संघांना कृतज्ञता पत्रक देण्यात आले. दापोली लाईफ लाईन संघटनेने सह्याद्री व महाबळेश्वर ट्रेकर्स यांना वस्तु प्रदान केल्या. ‘ कोणतीही मदत लागल्यास आवर्जुन सांगण्याचे ‘ आव्हानही सुमंत जुवेकर यांनी केले व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.
या कार्यक्रमानंतर सह्याद्री ट्रेकर्सचे प्रमुख श्री. संजय पारठे यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची कार्यशाळा घेतली. रॅपलिंग, आपत्ती व्यवस्थापन, आपत्ती अवस्था, परिणाम व प्रथमोपचार याविषयांवर अनेक प्रात्यक्षिके करुन घेण्यात आली. ‘ माणसाला वाचवणं हा मुख्य मुद्दा आहे ‘ असे सांगुन त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.