दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित दापोली येथील  दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजच्या सभागृहात 21 जानेवारी 2021 रोजी मराठी वाड्मय  मंडळातर्फे विशेषतः शिक्षकांसाठी कथाकथन तंत्र-मंत्र कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
कथाकथनाचा आपल्या अध्यापनात वापर करून विद्यार्थ्यांना अधिक रंजक पद्धतीने कसे शिकवता येईल, हे शिकवण्यासाठी मुख्यतः ही कार्यशाळा घेण्यात आली. याप्रसंगी संस्थेचे सेक्रेटरी डॉ. प्रसाद करमरकर यांची उपस्थिती असून दिलीप बर्वे, रमेश काळे, शामराव कराळे श्रीमती अपर्णा निरगुडकर हे प्रमुख व्याख्याते या कार्यशाळेस लाभले.
या कार्यशाळेच्या प्रथम सत्रात रमेश काळे यांनी अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला, पुणे या संस्थेच्या स्थापनेबाबत आणि व्यापक कार्य याबद्दल सर्वांना माहिती दिली. त्यानंतर व्याख्याते दिलीप बर्वे यांनी व्याख्यानातून ‘ कथेचा उगम ‘ कसा झाला ? , कथेचा प्रवास कसा होतो ? आणि कथा प्रसिद्ध झाल्या ?  यासंबंधी विविध उदाहरणे देऊन रंजक माहिती सांगितली.

या कार्यशाळेच्या द्वितीय सत्रात श्रीमती. अपर्णा  निरगुडकर यांनी ‘ कथाकथन तंत्र-मंत्र ‘ या विषयावर  व्याख्यान दिले.  कथाकथन करत असताना समोरील श्रोत्यांची मने कशी जिंकून घ्यावीत व कथेची निवड कशी करावी ? ,  कथा सादरीकरणाची शैली तसेच ती सादर करत असताना अभिनयाचा वापर कसा करावा ? अशा विविध मुद्यांवर भाष्य करीत त्यांनी उपस्थित श्रोत्यांची मने जिंकून घेतली.

कार्यशाळेच्या तृतीय सत्रात रमेश काळे यांनी ‘ कथेचे प्रकार’  या विषयावर मार्गदर्शन करताना चरित्रकथा, विज्ञान कथा, शौर्य कथा यांचा वापर करून विविध वयोगटातील विद्यार्थ्यांवर कशाप्रकारे उत्तम संस्कार कसे करता येऊ शकतात, हेही सांगितले.

या कार्यशाळेच्या चौथ्या सत्रामध्ये शामराव कराळे यांनी ‘कथेचा अध्यापनात वापर’ कसा करावा? याविषयी विस्तृत मार्गदर्शन केले. तसेच शालेय विद्यार्थ्यांना गणित, मराठी तसेच असे विविध विषय शिकवताना कथा कशा तयार कराव्यात हे देखील शिकवले.
कार्यशाळेच्या अखेरीस दिलीप बर्वे यांनी उपस्थितांना  कल्पना चावला यांच्यावर आधारित एक प्रेरणादायी चित्रफित दाखवली.

या कार्यशाळेच्या समारोपाप्रसंगी कॉलेजचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे यांनी आपल्या वक्तव्यातून ‘ शिक्षकांनी त्यांच्या  अध्यापन शैलीत बदल करणे किती आवश्यक
आहे ‘ , हे सांगून कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी मराठी मंडळ वाड्मय मंडळाच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे कौतुक केले.
या कार्यशाळेचे सुत्रसंचालन प्रा. मुग्धा कर्वे यांनी केले होते आणि या कार्यशाळेला उपस्थित राहुन  दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित विविध प्रशालांतील अनेक शिक्षकांनी उत्सफूर्तपणे प्रतिसाद दिला.