राष्ट्रीय युवा दिनानिमित्त ग्रंथालयात पुस्तक प्रदान सोहळा उत्साहात संपन्न.
आज दिनांक 12 जानेवारी 2021 रोजी राजमाता जिजाऊ जयंती आणि स्वामी विवेकानंद जयंती म्हणजेच राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजच्या ग्रंथालयात पुस्तक प्रदान सोहळा उत्साहात संपन्न झाला. पुस्तक संकलनाची मोहिम डिसेंबर महिन्यापासून कॉलेजमधील मराठी वाडमय मंडळ आणि राष्ट्रीय सेवा योजना NSS यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आली होती. यामध्ये विविध समाज माध्यमांचा वापर करून समाजातील नागरिकांना मुक्त हस्ते वाचनीय पुस्तके दान करण्यासाठी आवाहन करण्यात आले होते आणि या मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद देत अनेक वाचन प्रेमी नागरिकांनी आपली पुस्तके ग्रंथालयास दान केलीत.
या सोहळ्यात मराठी वाड्मय मंडळाच्या प्रमुख प्रा. मुग्धा कर्वे यांनी मोहिमेचा आढावा घेताना असे सांगितले की, सदर मोहिमे अंतर्गत एकूण शंभर पुस्तकांपेक्षा अधिक कथा -कादंबरी, शास्त्रीय, ऐतिहासिक व बालसाहित्य इत्यादी विविध विषयांवरील पुस्तके संकलित झालेली असून त्यातील बालसाहित्य विषयक पुस्तके राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत दत्तक घेतलेल्या गावात देण्यात येतील. प्रा मुग्धा कर्वे यांनी स्मिता मराठे, मोहिनी पाटील, प्रा. कैलास गांधी, डॉ. आदित्य कर्वे, कु. अनघा शिंपी इत्यादी दात्यांची नावे सांगून आपले आभार प्रदर्शित केले. सदर पुस्तके प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे व इतर शिक्षकांच्या हस्ते कॉलेजच्या ग्रंथपाल श्रीमती कीर्ती परचुरे यांना सुपूर्त करण्यात आली.
अशा प्रकारे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या वाचनाच्या व ज्ञानाच्या कक्षा रुंदाव्यात यासाठी राबवल्या गेलेल्या मोहिमेस संपन्नता प्राप्त झाली व याप्रसंगी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.