राष्ट्रीय पक्षी दिवस 5 जानेवारी
भारतामध्ये टिटवीच्या एकूण दोन जाती आढळतात. त्यातली एक जात म्हणजे माळटिटवी तिला पण पिवळ्या गाठीची टिटवी पण म्हणतो.या माळ टिटव्या कोरड्या प्रदेशातील माळरानावर पण पाण्याच्या आसपास आढळतात. यांना आपली हद्द खूप प्रिय असते आणि त्यासाठी त्या इतर पक्षाबरोबर आणि मोठ्या प्राण्यांनाही हुसकून लावतात. हे पक्षी नेहमी जमिनीवर आढळतात आणि तुरू तुरू पळत जाऊन मातीतील किंवा पानाखाली दडलेले किटक पकडून खातात. टिटवीचा विणीचा हंगाम उन्हाळ्यात असतो. नर मादीची जोडी जमल्यावर त्यांचे मीलन होते आणि मादीआणि नर मिळून जमिनीवर घरटे तयार करतात. या घरट्यात मादी चार अंडी घालते. यांच्या पंखाचा आणि पाठीचा रंग मातकट तपकिरी असून पोट मात्र पांढरेशुभ्र असते. मला एक खूप वेगळे प्रकारचे वर्तन मागे पावसाळ्यामध्ये दिसून आले.जुलैमध्ये आम्ही जयसिंगपूर, जिल्हा कोल्हापूर येथे आमचे एक वडिलार्जित माळरान आहे. तिथे गेलो होतो. लगबग चार-पाच एकर ती जमीन आहे. खूपच कोरडी आणि खडकाळ जागा आहे. नजर जाईल तिकडे फक्त दगड आणि माती तिथे गेल्यानंतर मला या टिटव्या ओरडताना दिसल्या. कुतूहल म्हणून मी त्यांच्या मागे मागे गेले. त्या अजिबात ती जागा सोडून दूर नाही गेल्या. त्या तिथेच भिरभिरत होत्या. जरासे पुढे जाऊन पाहिलं तर एक सुंदर घरटे आणि त्यात चार अंडी दिसली. ते पाहून मला खूप आनंद झाला कारण मी ते सगळे पहिल्यांदा पाहत होते. घरटं खूप वेगळ्या पद्धतीने बांधलं होतं. छोटा खड्डा होता बशी सारखा. त्या भोवती छोटी-छोटी गोल दगड आणि त्यामध्ये छानस गवतं अंथरले होतं. पिवळसर पांढरी तपकिरी ठिपके असलेली चार अंडी होती. थोड्या वेळाने पाऊस चालू झाला. मला खूप वेगळ्या प्रकारचे वर्तन त्या टिटव्या कडून पाहायला मिळाले.एक टिटवी अंडी उबवण्याची काम करत होती. आणि तिचा जोडीदार तिच्या अवती भोवतीच फिरत होता. तो आम्हाला दिसत नव्हता पण आवाज येत होता. तितक्यात काय झालं पाच-सहा कुत्र्यांचा कळप तिथे जवळ आला तेवढ्यात टिटवी जोरा मध्ये आरडाओरडा करत त्यांच्या दिशेने पळायला लागली. तिचा कर्कश आवाज ऐकून तिचा जोडीदारही तिथे दाखल झाला आणि काय आश्चर्य त्या दोघांनी त्या कुत्र्याच्या कळपाला त्या घरट्याच्या विरुद्ध दिशेला हुसकावून लावलं. त्यांनी घरट त्यांच्या नजरेस ही पडू दिलं नाही.खूप आश्चर्य वाटले हे पाहून किती समर्पणाची भावना आपल्या पिल्लांसाठी आणि किती ती जपणूक…
आज 5 जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस आहे.यानिमित्ताने आज कितीतरी पक्षी असे आहेत ज्यांचं संवर्धन आणि संरक्षण करणे हे आपल्या सामान्य नागरिकांचे काम आहे..पक्षी संवर्धनाचं काम करणाऱ्या बऱ्याच संस्था आहेत पण त्यांच्यामध्ये लोकसहभाग सुद्धा तेवढाच आवश्यक आहे त्यामुळे या दिवसाचे औचित्य साधून आपण आपल्या परिसरातील पक्षांच्या संवर्धनाचं काम करूया.
नंदा जगताप(सहा.प्राध्यापिका,) प्राणिशास्त्र विभाग, दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स कॉलेज दापोली. जिल्हा रत्नागिरी.