‘ आपल्या सभोवतालचे साप ‘ या विषयावर उद्बोधक राष्ट्रीयस्तरावरील वेबिनार संपन्न…
दापोली येथील दापोली अर्बन बॅंक सिनीयर सायन्स कॉलेजच्या निसर्ग मंडळ आणि IQAC विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १३ ऑगस्ट २०२१ रोजी दुपारी २ ते ४ यावेळेत नागपंचमी दिनाचे औचित्य साधून ‘ आपल्या सभोवतालचे साप ‘ या विषयावर उदबोधनपर राष्ट्रीयस्तरावरी वेबिनारचे आयोजन करण्यात आले. सदर वेबिनारमध्ये भारताभरातून विविध राज्यांमधील अनेक सर्प प्रेमी, वन्यजीवप्रेमी बहुसंख्येने सहभागी झाले होते.
सदर वेबिनारचे प्रास्ताविक IQAC समन्वयक डॉ. रघुनाथ घालमे यांनी केले असून याप्रसंगी उपस्थितांचे स्वागत आणि वेबिनारचे प्रमुख व्याख्याते ॲड. बुद्धकुमार कांबळे यांची ओळख निसर्ग मंडळाच्या प्रमुख प्रा.नंदा जगताप यांनी उपस्थितांना करून दिली.
वेबिनारचे प्रमुख व्याख्याते ॲड. बुद्धकुमार कांबळे हे वन्यजीव संशोधन सहाय्यक म्हणूनही कार्यरत असून ते ‘वन्यजीव संवर्धन संस्था महाराष्ट्र राज्य ‘ या संस्थेमार्फत वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धनाचे कार्य करीत आहेत.
आजपर्यंत त्यांनी दोन हजाराहून अधिक वन्यजीवांची मनुष्यवस्तीतून सुटका केलेली असून वन्यजीव संवर्धनासाठी जागरुकता निर्माण व्हावी, यासाठी त्यांनी विविध ठिकाणी सेमिनार्सही आयोजित केलेले आहेत.
सदर वेबिनार मध्ये ॲड. बुद्धकुमार कांबळे यांनी आपल्या सभोवती असणाऱ्या विषारी व बिनविषारी सापांची रंजक माहिती सांगितली. तसेच सापांविषयी समाजामध्ये जी अंधश्रद्धा रूढ आहे, त्याच्याविषयी उपस्थितांशी सखोल संवाद साधला.
तसेच या वेबिनारमध्ये ॲड. बुद्धकुमार कांबळे यांनी
‘ साप चावल्यानंतर कोणते प्रथमोपचार करावेत’ , याविषयीही उपस्थितांना मार्गदर्शित केले.
आणि वन्यजीव संवर्धनाविषयी आपले स्वानुभव करून वन्यजीव संरक्षणासाठी उपस्थितांना प्रोत्साहित केले.
सदर वेबिनारच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संदेश जगदाळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
तसेच याप्रसंगी प्रा. दिपाली नागवेकर यांनी वेबिनारचे सुत्रसंचालन केले असून प्रा. सदानंद डोंगरे व प्रा. शंतनू कदम यांनी तांत्रिक सहाय्य केले.