दापोली अर्बन बॅंक सिनीअर सायन्स कॉलेजमध्ये महिला दिन साजरा – ‘ स्त्रियांनी अन्यायाचा प्रतिकार केला तरच पुढची पिढी सुरक्षित ‘ – सहा. पोलिस निरिक्षक पुजा हिरेमठ
दापोली अर्बन बॅंक सिनीअर सायन्स कॉलेजच्या या रौप्यमहोत्सवी वर्षात दिनांक 8 मार्च रोजी कॉलेजच्या सभागृहात सकाळी १० वाजता महिला विकास कक्षाच्या संयुक्त विद्यमाने ‘ जागतिक महिला दिन ‘ अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणुन दापोलीतील सहा. पोलिस निरिक्षक सौ. पुजा हिरेमठ यांची मोलाची उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेच्या संचालिका सौ. नीलिमा देशमुख यांनी भुषविले असुन याप्रसंगी संस्थेच्या सी.डी. सी. सदस्या सौ. नसिरा परकार या देखील उपस्थित होत्या.
अनेक स्त्रियांनी आपल्या संघर्षाने आणि त्यांनी निवडलेल्या अनगळ वाटेने यश प्राप्त करून अनेक भगिनींना ‘ स्त्री’ म्हणून संस्कारित केलेलं आहे आणि म्हणूनच त्यांच्या स्मरणातून प्रेरणा घेण्यासाठी महाविद्यालयातील विद्यार्थीनींनी विविध वेशभूषा करून राजमाता जिजाबाई, अहिल्याबाई होळकर, जोधाबाई,रजिया सुलतान, झाशीची राणी , बेगम हजरत महल, रमाबाई रानडे सोनिया गांधी अशा अनेक कर्तबगार वीरांगनांच्या जीवनावर उत्तम वक्तृत्वाने आणि प्रकाशझोत टाकुन समस्त श्रोतृवृंदास प्रेरित केले.
या कार्यक्रमात स्वराज्य स्थापन करुन पारतंत्र्य झुगारणाऱ्या , समाज प्रबोधन करुन अनिष्ट प्रथा मोडणाऱ्या, ब्रिटीशां विरुद्ध लढणाऱ्या भारतीय स्त्रियांची पिढी आणि त्याचबरोबर
आताच्या स्त्रियांचे सामाजिक स्थान, त्यांच्यावर होणारा अन्याय व त्यासाठी करावे लागणारे प्रतिबंध याविषयी
प्राची म्हातले, किर्ती मालगुंडकर, श्वेतांबरी मोर, आफरिन माजगावकर, शाझिया पेटकर,शिफा काझी , सुमय्या मणियार, स्नेहल घडावले, सुकन्या भुवड, गौरी खोत या सर्व विद्यार्थीनींनी सखोल व प्रेरक विचार मांडले.
विद्यार्थीनींच्या वक्तृत्वानंतर दापोलीत कार्यरत असणाऱ्या आणि समाजातील स्त्रियांचे जीवन जवळुन अनुभवणाऱ्या सहा. पोलिस निरिक्षक सौ. पुजा हिरेमठ यांनी विद्यार्थ्यांशी स्त्रियांवरील अत्याचार व त्यांची मानसिक स्थिती याविषयी दिलखुलासपणे संवाद साधत स्वानुभव कथन केले आणि दैनंदिन जीवनात सजग व सतर्क राहण्याचा मोलाचा सल्ला दिला. तसेच ‘ स्त्रियांनीच स्त्रियांना पाठिंबा देऊन अन्यायाचा प्रतिकार केला तरच पुढची पिढी सुरक्षित राहिल’ असे ही त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या दुसर्या टप्प्यात अध्यक्षा सौ नीलिमा देशमुख यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये- ‘ स्त्रियांनी समोर आखून दिलेली लक्षमण रेषा न ओलांडता आपल्या कक्षा रुंदावल्या आहेत , असे सांगत पुढची उज्ज्वल पिढी घडवण्यासाठी सर्वांना प्रेरित केले. त्याचबरोबर सौ.नसिरा परकार यांनी आपल्या भाषणा द्वारे उपस्थित विद्यार्थीनींनी नव्या संधी शोधुन आपली शारीरिक, बौद्धिक व मानसिक कौशल्य ओळखुन समाजात मानाचे स्थान मिळवावे, असे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी प्राचार्यांच्या हस्ते
कॉमर्स प्रश्नमंजूषा स्पर्धेत प्रथम आलेल्या प्रतीक्षा राऊत या विद्यार्थीनीचा सत्कार करण्यात आला. अंतिम टप्प्यात प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे यांनी आपले प्रेरणादायी मनोगत व्यक्त करित समाजातील सुशिक्षित , समर्थ व कर्तुत्ववान स्त्रीयांनी ‘ ‘ सबल ‘ व्हावे आणि समाजात नवीन क्रांती घडवण्यासाठी महिलांनीच पुढाकार घ्यावा, असेही प्रतिपादित केले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विद्यार्थीनी जान्हवी दिवेकर हीने केले आणि प्रा. ऋजुता जोशी यांच्या आभार प्रदर्शनाने या कार्यक्रमाची सांगता झाली.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महिला विकास कक्षाच्या समन्वयक प्रा. ज्योती चौगले व प्रा.नंदा जगताप , प्रा. गंगा गोरे , प्रा. ऋजुता जोशी , प्रा. श्रुती आवळे , प्रा. सिद्दी साळगावकर यांनी मोलाचे कार्य केले.