दुर्मिळ औषधी वनस्पतींच्या प्रदर्शनास दापोलीकरांचा उत्तम प्रतिसाद..
औषधी वनस्पतींची ओळख व महत्व पटवून देण्यासाठी दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजमध्ये वनस्पतीशास्त्र विभाग आणि कॉप्स नर्सरी यांच्या संयुक्त विद्यमाने औषधी वनस्पतींच्या प्रदर्शनाचे आयोजन दिनांक २६ जानेवारी २०२४ रोजी करण्यात आले होते. प्रदर्शनाचे उदघाटन दापोली शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी डॉ. विनोद जोशी आणि प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे यांच्या हस्ते झाले.
या प्रदर्शनामध्ये शंभरहून अधिक औषधी वनस्पतींचा समावेश होता. यात प्रामुख्याने जासूद, रक्तचंदन, काळा कुडा, सीता अशोक, गुडमार, अग्निमंथ, अश्वगंधा, नीरब्राम्हि, समुद्रफळ, सर्पगंधा, वावडिंग, शिकेकाई, वेखंड इत्यादी गुणकारी वनस्पतींचा समावेश होता. वनस्पतीशात्र विभागातील विद्यार्थ्यांनी या औषधी वनस्पतींचे शास्त्रीय नाव, त्यातील घटक व औषधी गुणधर्म याबद्दल खूप छान माहिती दिली.
दापोली तालुक्यातील विद्यार्थी, प्राध्यापक, दापोली शिक्षण संस्थेचे सदस्य आणि अनेक जाणकार नागरिकांनी या प्रदर्शनास मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली आणि समाधान व्यक्त केले. काही जाणकार मंडळींनी हे प्रदर्शन मोकळ्या जागी मोठया प्रमाणावर घ्यावे असेही सुचविले. प्रा. अजिंक्य मुलुख यांनी या प्रदर्शनाचे समन्वयक म्हणून धुरा सांभाळली. प्रदर्शनाच्या यशस्वीतेकरिता महाविद्यालयाचे वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. रघुनाथ घालमे, प्रा. डॉ. विक्रम मासाळ, डॉ. निवास देसाई, प्रा. दीपाली नागवेकर, डॉ. पूनम पानस्कर यांनी विशेष मेहनत घेतली.