दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स कॉलेजमध्ये DSE Inspire कॅम्प उत्साहात संपन्न…
दापोली एज्युकेशन सोसायटी आणि दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स कॉलेजमध्ये यावर्षी
विद्यार्थ्यांसाठी पाचवा इन्स्पायर कॅम्प आयोजित करण्यात आला. हा कॅम्प दरवर्षी ११वीच्या
विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येत असून विद्यार्थ्यांनी मेडिकल, इंजिनिअरिंग प्रमाणे मूलभूत विज्ञान
शाखेस प्राधान्य देऊन आपले करिअर घडवावे, हा त्यामागील प्रमुख उद्देश आहे.
या कॅम्पमध्ये यंदाच्या वर्षी खेड, मंडणगड, दापोली इ. विविध भागांमधून एकूण 145 विद्यार्थी सहभागी
झाले होते. प्रथम दिवशी कॅम्पचे उद्घाटन मुंबई विद्यापीठाच्या डॉक्टरेट ऑफ सायन्स या सन्माननीय
पदवीने पुरस्कृत डॉ. अलका गोगटे यांच्या हस्ते करण्यात आले आपल्या बीजभाषणामध्ये त्यांनी असेही
प्रतिपादन केली की – विद्यार्थ्यांनी इन्स्पायर मध्ये चौकस बुद्धीने ज्ञान आत्मसात करावे आणि संधीचा
लाभ घ्यावा.
प्रथम सत्राच्या व्याख्यानामध्ये त्यांनी Revolution in medical diagnostic test याबद्दल सखोल माहिती
विद्यार्थ्यांना दिली.
प्रथम दिवसाच्या दितीय सत्रामध्ये महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. दिगंबर कुलकर्णी
यांनी इयत्ता ११वीच्या अभ्यासक्रमातील Introduction to electricity and electronics या विषयावर
मार्गदर्शनपर व्याख्यान दिले.
भौतिक शास्त्रातील मूलभूत संकल्पना त्यांनी अत्यंत सोप्या भाषेत विद्यार्थ्यांना समजावून सांगितल्या.
केवळ करिअरच्या दृष्टिकोनातूनच नव्हे तर विद्यार्थ्यांना चालू शैक्षणिक वर्षातील अभ्यासक्रमासाठीही हा
कॅम्प खूप उपयुक्त ठरतो हे यातून दिसून येते.
द्वितीय दिवशी प्रथम सत्रात विद्यार्थ्यांना श्रीनाथ कवडे हे वनस्पतीशास्त्र तज्ञ व्यक्ती मार्गदर्शक म्हणून
प्राप्त झाले. पश्चिम घाटातील जैवविविधता या विषयावर त्यांनी अत्यंत रंजक माहिती दिली.
आपल्या व्याख्यानात त्यांनी जैवविविधता, दुर्मिळ प्रजाती, त्यांचे संवर्धन कसे करावे याविषयी
विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
जैवविविधता संवर्धनासाठी त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. ते स्वतः सोसायटी ऑफ एनवोर्मेन्ट अँड
बायोडायव्हर्सिटी कंजर्वेशन, रत्नागिरी या संस्थेचे भाग आहेत.
द्वितीय सत्रात महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या प्रमुख प्रा. पुनम पाटील यांनी History and
scope in microbiology याविषयी मार्गदर्शनपर व्याख्यान दिले. जिवाणूंची उत्पत्ती आणि त्यांचा आपल्या
दैनंदिन जीवनातील सहभाग, मानवी आरोग्य तसेच विविध संशोधकांची माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना
दिली.
तृतीय दिवशी प्रथम सत्रात विद्यार्थ्यांना संगणक विभागाच्या प्राध्यापिका श्राव्या पवार यांनी कम्प्युटर
नेटवर्किंग याविषयी माहिती दिली. तसेच नेटवर्कचे प्रकार, त्याची माध्यमे, त्यासाठी वापरण्यात येणारी
साधने इत्यादी अभ्यासक्रमातील संकल्पना त्यांनी व्याख्यानातून समजावून सांगितल्या.
तसेच क्रिप्टोग्राफी या संगणकाच्या नवीन संकल्पनेबद्दल विद्यार्थ्यांना सखोल माहिती दिली.
द्वितीय सत्रात महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागाच्या प्रा. नंदा जगताप यांनी रिप्रोडक्टिव
फिजिओलॉजी याबद्दल मार्गदर्शन पर व्याख्यान दिले. तसेच व्याख्यानानंतर एका चित्रफितीद्वारे मुलाची
आईच्या गर्भात होणारी वाढ दाखवण्यात आली त्यामुळे अनेक महत्त्वपूर्ण संकल्पना विद्यार्थ्यांना सहज
समजल्या.
चौथ्या दिवषी प्रथम सत्रात प्रा. आर आर ताम्हणकर यांनी Basic concept in mathematics आणि द्वितीय
सत्रात प्रा. विश्वेष जोषी यांनी fundamentals in fiber optics यावर व्याख्यान दिले. या दिवशी विद्यार्थ्यांचे
गट पाडून प्रश्नमंजुषा घेण्यात आली ज्यामध्ये ज्ञानदीप विद्या मंदिर महाविद्यालय या गटाचा प्रथम
क्रमांक आला.
५व्या दिवशी पहिल्या सत्रात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲन्ड रिसर्च, पुणे या
संस्थेमधून डॉ अशोक उपनेर यांनी कार्यशाळा घेतली. यामध्ये विविध वैज्ञानिक संकल्पना प्रयोगांमधून
दाखविण्यात आल्या आणि प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांकडुन करवुन घेण्यात आली. शेवटच्या सत्रामध्ये
रसायनशास्त्र या विषयावर आधारित व्याख्यान कैलास गांधी यांनी दिले.
समारोप समारंभा प्रसंगी संचालक मंडळाचे सदस्य दिनेश नायक यांची अध्यक्ष म्हणून उपस्थिती होती.
प्रमुख पाहुणे म्हणून कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथील असिस्टंट प्रोफेसर अमित देवगिरीकर यांची
उपस्थिती होती. याप्रसंगी स्पर्धेत विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
संपूर्ण कॅम्पचा आढावा दिपाली दिवाण यांनी घेतला. उपस्थितांचे आभार प्रदर्शन सायन्स असोसिएशनचे
प्रमुख संतोष मराठे यांनी घेतला. अशाप्रकारे हा पाच दिवसांचा कॅम्प प्राध्यापक, सहाय्यक, विद्यार्थी
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि सहभागी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहात पार पडला.