दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स कॉलेजचे विशेष निवासी श्रम संस्कार शिबिर उत्साहात संपन्न.
दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सात दिवसांचे निवासी श्रमसंस्कार शिबिर दत्तक गाव उंबर्ले येथे नुकतेच जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श केंद्र शाळा, उंबर्ले येथे उत्साहात पार पडले.
दि 30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2025 या कालावधीत संपन्न झालेल्या या शिबिरात स्वयंसेवकांनी संविधान जनजागृती अभियान हाती घेऊन त्यासाठी गावातून संविधान प्रस्तावना जनजागृती रॅली काढली. माझी वसुंधरा व स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छता अभियान रॅली काढून स्वच्छतेच्या सवयींचे महत्व पटवून देणारे पथनाट्य सादर केले. याशिवाय गावकऱ्यांच्या मदतीने गावच्या नदीवर 5 वनराई बंधारे बांधले. या सर्वांबरोबर आरोग्य तपासणी, माती काम कार्यशाळा, रस्ते दुरुस्ती, परसबाग निर्मिती, शाळा परिसर रंगरंगोटी, प्लास्टिक बंदी जनजागृती इत्यादी विविध उपक्रम राबविले. या शिबिराचे नियोजन कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. मनोज लाड आणि प्रा. डॉ. विजय गुरव यांनी केले होते. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना समितीचे प्रा. अनिरुद्ध सुतार, डॉ. पुनम पानसकर, प्रा. डॉ. ज्योती दिंडे, प्रा. नेत्रांजली महाडीक, प्रा. सुजित टेमकर, प्रा. स्वप्निल साळवी, प्रा. उत्कर्षा गुरव, श्री. अनिकेत घोसाळकर, श्रीमती मंजुषा येडेकर तसेच विद्यार्थी प्रतिनिधी मयुरेश जाधव व इक्रा ममतुले यांनी विशेष मेहनत घेतली. दापोली एज्युकेशन सोसायटीचे संचालक मा. श्री रवींद्र कालेकर व मा. श्री. अशोक जाधव यांनी शिबिराला भेट दिली व सर्व शिबिरार्थींना मार्गदर्शन केले. शिबिरामध्ये विविध व्याख्यानांचे आयोजन देखील करण्यात आले होते. प्रा. डॉ. मनोज लाड यांनी नॉट मी बट यु आणि ऑनलाईन बिन लाईन या विषयावर मार्गदर्शन केले. मा. श्री. निरंजन उपासनी यांचे पंचमहाभूते या विषयावर व्याख्यान झाले. मा. श्री. पांडुरंग हुबाळे यांचे आरोग्य विषयक समस्या या विषयावर व्याख्यान झाले व यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिरात प्रा.संतोष मराठे व मा. श्री. मयूर पाटणकर यांचे भारतीय संविधान विषयावर व्याख्यान झाले. तसेच वाईल्ड ॲनिमल रेस्क्यूअर दापोली या संस्थेचे सफर सर्प विश्वाची या विषयावर व्याख्यान झाले. प्रा. कैलास गांधी यांनी घर कवितांचे या विषयावर विविध कवितांचे सादरीकरण केले. प्रा. दिगंबर कुलकर्णी यांनी या शिबिरात योगासन मार्गदर्शन केले.
शिबिराच्या समारोप कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून दापोली एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन डॉ.प्रसाद करमरकर हे लाभले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे, मा. श्री नरेंद्र मांडवकर, सरपंच ग्रुप ग्रामपंचायत उंबर्ले ओळगाव, मा. श्री रवींद्र रसाळ, उपसचिव, ग्रामविकास मंडळ उंबर्ले, मा. सौ. स्वप्नजा शिंदे, मुख्याध्यापिका, जि. प. पु. प्राथ. आदर्श केंद्र शाळा, महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. सौ. गंगा गोरे इ. उपस्थित होते.

