दापोली अर्बन बँक सिनीअर सायन्स कॉलेजचा रौप्य महोत्सवी वर्ष शुभारंभ सोहळा उत्साहात संपन्न.
दापोली,
यंदाचे २०२० – २१ हे शैक्षणिक वर्ष दापोली येथील दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित दापोली अर्बन बँक सिनीअर सायन्स कॉलेजसाठी रौप्य महोत्सवी वर्ष ठरले आहे. दापोली येथील विद्यार्थ्यांना विज्ञानाचा शैक्षणिक वारसा देणारे हे कॉलेज गेली २४ वर्षे निरंतर विज्ञान व वाणिज्य शाखेत शिक्षण प्रदान करत आहे. या महाविद्यालयातील पदवीधर व पदवीव्युत्तर अनेक विद्यार्थ्यांनी क्रमिक अभ्यासक्रमा सोबतच कलागुणांची सांगड घालून आविष्कार रिसर्च कनव्हेशन, युवा महोत्सव, विद्यापीठीय व आंतरमहाविद्यालयीन क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन अखंडपणे महाविद्यालयाचे नाव उज्जवल केले आहे. हे महाविद्यालय दरवर्षी DES inspire camp, N.S.S.
निवासी शिबीर, क्षेत्रभेट, विज्ञान जागर तसेच विविध मार्गदर्शन व जनजागृतीपर व्याखाने, कलात्मक कार्यशाळा, वाचन सप्ताह इ. उपक्रमांचे आयोजन करुन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना उत्तम वाव कसा देता येईल यासाठी तत्पर राहिलेले आहे. या महाविद्यालयाने 2016-17 यावर्षी ग्रामीण विभागातील सर्वोत्तम महाविद्यालयाचे मानचिन्ह मुंबई विद्यापीठाकडुन प्राप्त केले असून त्यासोबतच N.S.S. मध्येही सर्वोत्तम कार्य करुन या कॉलेजने दापोलीत आपले नावलौकिक प्राप्त केले, ही अत्यंत कौतुकास्पद बाब ठरली आहे. महाविद्यालयाचा हा रौप्य महोत्सवी शुभारंभ सोहोळा ५ ऑगस्ट २०२० रोजी सकाळी ११.३० वाजता सभागृहामध्ये सामाजिक अंतराचे भान राखून उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी संस्थेतील सर्व माननीय वरिष्ठ आजी व माजी संचालक, सदस्य , प्राचार्य तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित असुन प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे यांनी सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
उपस्थित मान्यवरांनी गत २४ वर्षांत आलेले आपले रंजक स्वानुभव आपल्या मनोगतातून कथन करुन कॉलेजप्रती आपली कृतज्ञता समर्पक शब्दांत व्यक्त केली. याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष श्रीराम माजलेकर यांनी आपल्या मनोगतातून ‘ दापोली अर्बन बँक ‘ व इतर अनेक देणगीदारांच्या मोलाच्या आर्थिक योगदानामुळेच दापोली अर्बन बँक सिनीअर सायन्स कॉलेजची स्थापना होऊ शकली, याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
या शुभारंभ सोहळ्याच्या अंतिम टप्प्यात प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे यांनी १९९६ सालापासून केवळ १८ विद्यार्थ्यांना घेऊन सुरु झालेल्या या कॉलेजच्या प्रगतीचा भाषणातून आढावा घेतला. तसेच कॉलेजच्या भविष्यकालीन प्रगतीसाठी आखलेल्या विविध योजना व उपक्रमांची माहिती देऊन उपस्थित कर्मचारी वर्गास प्रोत्साहित केले. हे महाविद्यालय अनेकांच्या निस्वार्थ कार्यामुळे, संस्थेचे पाठबळ व आर्थिक सहकार्य व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या जिद्दीमुळे महाविद्यालयाने आपला बहुअंगी विकास साधला आहे हे मान्यवरांच्या मनोगतातून प्रकर्षाने जाणवीले.
या शुभारंभ सोहळ्याचे सुत्रसंचालन प्रा. कैलास गांधी यांनी केले होते.