दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेज मध्ये रक्तदान शिबिर उत्साहात
दापोली शिक्षण संस्था संचालित दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS), राष्ट्रीय छात्र सेना (NCC) आणि आजीवन अध्ययन आणि विस्तार (DLLE) यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले.
उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झालेल्या या शिबिरामध्ये ४३ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे उत्कृष्ट उदाहरण घालून दिले. सदर रक्तसंकलन जनकल्याण रक्तकेंद्र, महाड यांच्या रक्तपेढीसाठी करण्यात आले.
रक्तदान हे मानवतेच्या सेवेसाठी अत्यंत पवित्र कार्य असून, विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव व सेवाभाव निर्माण करण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरास विद्यार्थी, शिक्षक व इतर रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी दापोली एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन डॉ प्रसाद करमरकर,
सेक्रेटरी डॉ विनोद जोशी आणि ज्येष्ठ संचालक श्री. रवींद्र कालेकर हे पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. घनश्याम साठे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. रक्तसंकलनाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडल्याबद्दल जनकल्याण रक्तकेंद्र, महाड यांच्या वैद्यकीय अधिकारी यांनी महाविद्यालयाचे आणि सर्व रक्तदात्यांचे आभार मानले.
या उपक्रमाचे नियोजन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.निवास देसाई आणि डॉ विजय गुरव, डी.एल. एल. इ. समन्वयक डॉ. गंगा गोरे, राष्ट्रीय छात्र सेनेच्या प्रमुख सौ. निधी भडवळकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रेयस लवरे, ऋत्वी टिकेकर या गटप्रमुखांसह सर्व स्वयंसेवकांनी अत्यंत मेहनतीने व जबाबदारीने योगदान दिले. स्वयंसेवकांनी रक्तदात्यांची नोंदणी, जनजागृती, नियोजन व शिबिरातील विविध जबाबदाऱ्या उत्कृष्टपणे पार पाडून शिबिर यशस्वी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
महाविद्यालयाच्या वतीने रक्तदान करणाऱ्या सर्व ४३ रक्तदात्यांचे, जनकल्याण रक्तकेंद्राच्या टीमचे, सर्व स्वयंसेवकांचे तसेच प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

