दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी घेतला इस्रोच्या अंतराळ प्रवासाचा माहितीपटातून वेध
दापोली : दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजच्या भौतिकशास्त्र विभागातर्फे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) गौरवशाली वाटचालीवर आधारित माहितीपटाची निर्मिती आणि सादरीकरण १५ ऑगस्ट २०२६ रोजी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने प्रभावीपणे करण्यात आले.
भौतिकशास्त्र विभागातील एफ.वाय., एस.वाय. आणि टी.वाय.च्या विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे इस्रोच्या कार्याचा अभ्यास करून या माहितीपटाची निर्मिती केली. भारताच्या अंतराळ संशोधनातील प्रगती, वैज्ञानिकांचे योगदान आणि विविध महत्त्वपूर्ण अंतराळ मोहिमांची माहिती या माहितीपटाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी अत्यंत सुंदर व प्रभावी पद्धतीने मांडली.
माहिती सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सार्थक गुरव, प्रथम कोवळे, नांदगावकर अल्फिया, लोगडे आयेशा, सुतार धनश्री, घडवले साक्षी, गुरव मृणाल हे विद्यार्थी होते. माहितीपटाची निर्मिती आणि कार्यक्रमाचे व्यवस्थापन बैकर आर्यन, राठोड हर्षवर्धन, कदम श्रवण, नाचरे विनीत, धोत्रे कार्तिक, सुवरे ऋतू, खानविलकर ग्रीष्मा, पानवलकर शर्वरी, चव्हाण स्नेहा, पडावी सोनाली, मर्चंडे सिद्धी यांनी सांभाळले तर साखरकर आयुष, कदम वेदांत, कार्तिक गुरव, महाजन शंतनु या विद्यार्थ्यांनी तांत्रिक बाबी सांभाळल्या.
या माहितीपटामध्ये आर्यभट उपग्रह, INSAT मालिका, चांद्रयान-१, चांद्रयान-२, चांद्रयान-३, मंगळयान (Mars Orbiter Mission) तसेच आदित्य-L1 यांसारख्या भारताच्या महत्त्वपूर्ण अंतराळ मोहिमांचा प्रामुख्याने उल्लेख करण्यात आला. इस्रोच्या सुरुवातीपासून ते चंद्र व सूर्याच्या अभ्यासापर्यंतच्या भारताच्या अंतराळ प्रवासाचा माहितीपूर्ण आढावा विद्यार्थ्यांनी सादर केला.
या उपक्रमासाठी भौतिकशास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्रा. डी. डी. कुलकर्णी सर, तसेच सहाय्यक प्राध्यापक प्रा. व्ही. आर. जोशी, प्रा. ए. एस. महाजन सर तसेच परिचर यश पवार यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना माहितीपटाच्या निर्मितीपासून ते अंतिम सादरीकरणापर्यंत विविध टप्प्यांमध्ये मोलाची मदत मिळाली.
विद्यार्थ्यांनी माहितीपटासाठी संशोधन, निवेदन, दृश्यसाहित्य, सादरीकरण तसेच तांत्रिक बाबींमध्ये सक्रिय सहभाग घेतला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधनवृत्ती, संघभावना आणि सादरीकरण कौशल्याला चालना मिळाली.
विद्यार्थ्यांमध्ये अंतराळ संशोधन, विज्ञान आणि तंत्रज्ञानाविषयी जागरूकता व जिज्ञासा निर्माण करण्याच्या उद्देशाने हा माहितीपट इतर महाविद्यालयांमध्येही सादर करण्याचा विभागाचा मानस आहे. इस्रोच्या या माहितीपटाचे आपल्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी सादरीकरण आयोजित करण्याची इच्छा असलेल्या महाविद्यालयांनी दापोली अर्बन बँक कॉलेजच्या भौतिकशास्त्र विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले
या माहितीपटाचे महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. जी. बी. साठे आणि संस्थेचे संचालक श्री. रविंद्र कालेकर तसेच सर्व प्राध्यापकांनी कौतुक करून सहभागी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले.

