दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजमध्ये ‘आविष्कार’ पूर्वतयारी कार्यशाळा उत्साहात संपन्न
मुंबई विद्यापीठातर्फे प्राध्यापकांसाठी संशोधन गुणवत्ता वाढीसाठी कार्यशाळा
मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागातर्फे आयोजित ‘आविष्कार २०२६-२७’ ह्या आंतर-महाविद्यालयीन संशोधन परिषदेच्या पूर्वतयारीसाठी दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेज येथे प्राध्यापकांसाठी जिल्हास्तरीय ‘आविष्कार’ कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
विद्यार्थ्यांमधील संशोधक वृत्तीला चालना देण्याच्या उद्देशाने विद्यार्थ्यांना प्रेरित करणे, विद्यार्थ्यांनी निवडलेल्या संशोधन विषयासाठी विषयाचा आवाका, विषयाची उपयुक्तता आणि दैनंदिन जीवनातील महत्त्व इ. बाबतीत मार्गदर्शन करण्यासंदर्भात प्राध्यापकांसाठी विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. ही कार्यशाळा विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सुनील पाटील, आविष्कार ओ.एस.डी. डॉ. मीनाक्षी गुरव, रत्नागिरी जिल्हा समन्वयक प्रो. डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई आणि रत्नागिरी जिल्हा सह-संयोजक तथा दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजचे प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. घनश्याम साठे यांच्या प्रमुख देखरेखीखाली पार पडली. या उद् घाटन प्रसंगी दापोली एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन डॉ. प्रसाद करमकर यांनी अध्यक्षस्थान भूषवले. अध्यक्षीय भाषणात बोलताना डॉ. करमकर म्हणाले, “प्राध्यापकांनी अधिकाधिक दर्जेदार आणि समाजोपयोगी संशोधन प्रकल्प ‘आविष्कार’ स्पर्धेत सादर करावेत. संशोधन केवळ कागदावर किंवा प्रयोगशाळेपुरते मर्यादित न राहता त्याचा थेट फायदा समाजाला झाला पाहिजे.” कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य प्रा. डॉ. घनश्याम साठे यांनी केले. त्यांनी आविष्कार स्पर्धेचे स्वरूप, नियम व अटी आणि उत्कृष्ट प्रकल्प सादरीकरणाबाबत सविस्तर माहिती दिली.
या कार्यशाळेत रत्नागिरी जिल्ह्यातील २३ महाविद्यालयांमधून ६० प्राध्यापक सहभागी झाले होते. तज्ज्ञ मार्गदर्शक डॉ. शशिकांत मेनन, डॉ. सुनिता शैलजन आणि डॉ. मीनाक्षी गुरव यांनी उपस्थित प्राध्यापकांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना संशोधनासाठी कसे प्रेरित करावे आणि प्रकल्पांची गुणवत्ता कशी वाढवावी, यावर चर्चा झाली.
कार्यशाळेचे सुयोग्य नियोजन आविष्कार व प्लेसमेंट कमिटीचे समन्वयक डॉ. विक्रम मासाळ, समिती सदस्य डॉ. निवास देसाई, डॉ. पूनम पानस्कर, प्रा. दिपाली नागवेकर, प्रा. सिद्धी साळगावकर, श्री. महेश ठीक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दिपाली नागवेकर यांनी केले, तर कार्यक्रमाचा आढावा व आभारप्रदर्शन डॉ. विक्रम मासाळ यांनी केले. आगामी ‘आविष्कार’ परिषदेत रत्नागिरी जिल्ह्याचा ठसा उमटवण्यासाठी ही कार्यशाळा अत्यंत फलदायी ठरेल अशी भावना सहभागी प्राध्यापकांनी व्यक्त केली.

