दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजचा माजी विद्यार्थी चिन्मय वैशंपायनची इस्रायलमध्ये पीएच.डी. साठी निवड
दापोली : दापोली एज्युकेशन सोसायटीच्या दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजमधील रसायनशास्त्र विभागाचा माजी विद्यार्थी चिन्मय उमेश वैशंपायन याने आपल्या गुणवत्तेच्या जोरावर महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. सन २०२२ मध्ये महाविद्यालयात रसायनशास्त्र विषयातून पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढील पदव्युत्तर शिक्षणासाठी त्याची IISER तिरुवनंतपुरम येथे निवड झाली. पदव्युत्तर शिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर त्याने सादर केलेल्या प्रेझेंटेशनच्या आधारे इस्रायलमधील एरियल युनिवर्सिटीत पीएच.डी. करण्यासाठी त्याची निवड झाली आहे.
चिन्मयची ही उल्लेखनीय शैक्षणिक कामगिरी दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजसाठी तसेच दापोली एज्युकेशन सोसायटीसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. त्याच्या या यशाबद्दल दापोली एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. प्रसाद करमरकर, सचिव डॉ. विनोद जोशी, संचालक श्री. रविंद्र कालेकर, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा.डॉ. घनशाम साठे, रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रा.डॉ. गंगा गोरे तसेच रसायनशास्त्र विभागातील प्रा. कैलास गांधी, प्रा. संतोष मराठे, प्रा.डॉ. बापू यमगर, प्रा.डॉ. विजय गुरव, प्रा.डॉ. मनोज लाड, प्रा. तेजस मेहता तसेच चिन्मयचे वडील डॉ. उमेश वैशंपायन यांच्या उपस्थितीत चिन्मयचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्याला पुढील शैक्षणिक व संशोधनाच्या वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.
या सत्कार सोहळ्यानंतर चिन्मयने महाविद्यालयातील तृतीय वर्ष रसायनशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केले. उच्च शिक्षणाच्या संधी, संशोधन क्षेत्रातील वाटचाल, परदेशातील शिक्षण तसेच आपल्या ध्येयाकडे सातत्याने वाटचाल करण्याबाबत त्याने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
चिन्मय वैशंपायनची ही यशस्वी वाटचाल महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी असून, ग्रामीण भागातील विद्यार्थीदेखील गुणवत्ता, मेहनत आणि सातत्याच्या जोरावर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण करू शकतात, हे त्याने आपल्या कामगिरीतून सिद्ध केले आहे.

