दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत विशेष श्रमसंस्कार निवासी शिबिराला उत्साहात सुरुवात
दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सात दिवसांचे विशेष श्रमसंस्कार निवासी शिबिर उंबर्ले या दत्तक गावातील जिल्हा परिषद आदर्श शाळा, उंबर्ले येथे सुरू झाले.सदरचे शिबीर 30 नोव्हेंबर 2025 ते 6 डिसेंबर 2025 या दरम्यान गावात नियोजित केले आहे.
या शिबिराचे उदघाटन श्री. निरंजन उपासनी लाईफ कन्सल्टंट, पुणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दापोली एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी डॉ. विनोद जोशी, संचालक श्री. श्रेयस काकिर्डे, प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे, सरपंच मा. श्री नरेंद्र मांडवकर, डाॅ. प्रकाश घांगुर्डे, अध्यक्ष ग्रामविकास मंडळ उंबर्ले,सौ. निलम खळे महिला ग्रामविकास अध्यक्षा उंबर्ले, राष्ट्रीय सेवा योजनेच्या डॉ. पूनम पानस्कर, प्रा. स्वप्नील साळवी, प्रा. उत्कर्षा गुरव व अनेक मान्यवर व ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे श्री निरंजन उपासनी यांनी स्वयंसेवकांना राष्ट्रीय सेवा योजनेच्या ब्रीद वाक्याचे अर्थ जाणून काम करण्यास सांगितले. गावचे सरपंच श्री नरेंद्र मांडवकर यांनी स्वयंसेवकांना ग्रामपंचायत नेहमी सहकार्य करेल असे आश्वासन दिले. दापोली एज्युकेशन सोसायटीचे संचालक श्री. श्रेयस काकीर्डे यांनी सर्व स्वयंसेवकांना श्रमसंस्काराचे महत्व सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि दापोली एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी डॉ. विनोद जोशी यांनी भारतीय संस्कृतीत समाजसेवा आणि प्राचीन परंपरा याचे महत्त्व सांगितले.कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. मनोज लाड यांनी शिबिराचे प्रास्ताविक सादर केले. कार्यक्रम अधिकारी प्रा. विजय गुरव यांनी आभार प्रदर्शन केले. याप्रसंगी महाविद्यालयाची विद्यार्थीनी मृदुला शेवडे हिने सर्व उपस्थितांकडून संविधान उद्देशिका म्हणून घेतली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अनिरुद्ध सुतार यांनी केले.

