*दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स महविद्यालयामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा*
दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधुन महाविद्यालयातील सायन्स असोसिएशनने विद्यार्थांसाठी प्रा. डी. डी. कुलकर्णी (भौतिकशास्त्र विभाग प्रमुख) यांचे व्याख्यान आयोजित केले होते. तसेच महाविद्यालयातील सुक्ष्मजीव विभागाने सायन्स फन फेअर चे आयोजन केले होते.
व्याख्याना दरम्यान विद्यार्थांना मार्गदर्शन करताना प्रा. डी. डी. कुलकर्णी यांनी राष्ट्रीय विज्ञान दिन हा नोबेल पारितोषिक विजेते भारतीय शास्त्रज्ञ डॉ. सी. व्ही. रामन यांनी ज्या दिवशी रामन इफेक्ट हा शोध जगासमोर मांडला त्या दिवशी साजरा करण्यात येतो असे सांगितले व त्या प्रयोगाची विस्तृत माहिती विद्यार्थांना दिली. विज्ञानातील प्रगती ही मानवी जीवन सुखकर करणारी निश्चितच आहे पण विज्ञानातील शोध हे विवेकी लोकांच्या हातात हवेत तरच लोककल्याण होते अन्यथा विध्वंस उद्भवू शकतो असे सांगितले. १७ व १८ व्या शतकात पाश्चिमात्य जगात अनेक शोध व वैज्ञानिक उपलब्धी निर्माण झाल्या. त्याच वेळी व किंबहुना अगोदरच्या काळातही भारतात असे संशोधन झाले होते हे सांगितले व त्याच बरोबर हे संशोधन भारतीय भाषेत आपल्यामुळे आजही जगाला त्या अपरिचीत आहेत त्या जगासमोर आणण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांची आहे. अशी भावना प्रा. डी. डी. कुलकर्णी यांनी बोलून दाखवली. ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. तेजस मेहता यांनी केले तर कार्यक्रमाचे व्यवस्थापन सायन्स असोसिएशनचे प्रमुख प्रा. संतोष मराठे यांनी केले.
विज्ञान दिनाच्या निमित्ताने महाविद्यालयातील सुक्ष्मजीव शास्त्र विभागाने सायन्स फन फेअर चे आयोजन केले होते. यामध्ये सापशिडी सारखे छोटे खेळ, कोडी यांच्या माध्यमातून विज्ञानातील अनेक संकल्पना सर्वसामान्य लोकांना समजतील अशा स्वरूपात मांडल्या होत्या. रंजक पद्धतीेने विज्ञान हे सर्वसामान्यांनपर्यंत पोहोचवता येऊ शकते हेच ह्या फन फेअर चे मुख्य वैशिष्ट्य होते.
हे सायन्स फन फेअर यशस्वी करण्यासाठी विभागप्रमुख प्रा. प्रियांका साळवी, इतर शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांनी विशेष प्रयत्न घेतले.
या दोन्ही कार्यक्रमासाठी संस्थाचालक व प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे यांचे मार्गदर्शन लाभले.