दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स महाविद्यालयात जागतिक महिला दिन साजरा.
दापोली शिक्षण संस्था संचालित दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स महाविद्यालयाच्या महिला विकास कक्षातर्फे आज जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. या दिवसाचे औचित्य साधून कर्णबधीर आणि बहु विकलांग विद्यार्थ्यांसाठी पुनर्वसन केंद्र चालविणाऱ्या ज्येष्ठ समाज सेविका सौ. रेखा बागुल यांचे ‘ स्त्री जीवन काल आज आणि उद्या ‘ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला आय. क्यू. एस. सी. चे सहसमन्वयक प्रा. कैलास गांधी यांच्या हस्ते सौ बागुल यांचा शाल, पुस्तक आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. आपल्या भाषणात सौ. बागुल यांनी जुन्या भारतीय संस्कृतीतील स्त्री जीवनाचा आढावा घेऊन आजच्या आणि उद्याच्या मुलींनी आणि स्त्रियांनी बदलेल्या नव्या जमान्याचा डोळसपणे विचार करण्याची गरज अधोरेखित केली. महिला दिन हा केवळ उत्सव न राहता महिलांचे खरेखुरे सक्षमीकरण व्हायला हवं आणि त्यासाठी केवळ महिला दिन नाही तर पुरुष दिन साजरा करून त्यांचेही प्रबोधन करणे आवश्यक असल्याचे विचार त्यांनी तळमळीने मांडले.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेल्या प्रा. कैलास गांधी यांनी जागतिक महिला दिन साजरा करण्यामागील पूर्वपिठिका सांगून सर्वांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ऋजुता जोशी यांनी केले तर ग्रंथ पाल कीर्ती परचुरे यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी महिला विकास कक्षाच्या प्रमुख प्रा. प्रियांका साळवी, प्रा. श्रद्धा खूपटे, प्रा. नेत्रांजली महाडिक, प्रा. फौजिया चिपळूणकर, प्रा. श्राव्या पवार, प्रा. निशिगंधा बंदरकर इ. प्राध्यापिकासह मोठ्या संख्येने विद्यार्थीनी उपस्थित होत्या.