*दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजचे राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेत यश*
सावरकर दर्शन प्रतिष्ठान, मुंबई; डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, पुणे यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती आंतर-महाविद्यालयीन राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेत दापोली एज्युकेशन सोसायटी संचलित दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स महाविद्यालयातील अनिरुद्ध भागवत (S.Y.C.S.) आणि दिव्या केळकर (T.Y.B.Sc – Physics) या विद्यार्थ्यांनी सांघिक उपविजेतेपद पटकावले. तसेच दिव्या केळकर या विद्यार्थिनीने वैयक्तिक बक्षीसांमध्ये तृतीय क्रमांक पटकावला. उपविजेतेपदाच्या ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्र यासह आयोजकांकडून महाविद्यालयाला स्वातंत्र्यवीर सावरकरानी लिहिलेली ‘हिंदुत्व’ ‘भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने’ ‘काळे पाणी’ ही पुस्तके आणि वीर सावरकर यांच्या जीवनावरील चरित्रपट बक्षीस स्वरूप प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्यातील कुडाळ, रत्नागिरी, दापोलीपासून मराठवाड्यातील व पुण्यातील अनेक महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. 23 महाविद्यालयांमधून 45 स्पर्धक स्पर्धेसाठी आले होते. स्पर्धेचे परीक्षण इतिहासतज्ञ, लेखक, वक्ते आणि संशोधक डॉक्टर लहू गायकवाड, राष्ट्रीय कीर्तनकार क्रांतीगीता महाबळ; आणि दूरदर्शन व नभोवाणीचे श्रेष्ठ पत्रकार, पुणे ऑल इंडिया रेडिओचे डेप्युटी डायरेक्टर, देवर्षी नारद पुरस्कार विजेते – महाचर्चाकार नितीन केळकर या तीन मान्यवरांनी केले.
सदर स्पर्धेसाठी श्री सौरभ बोडस, श्री. वामन पेठे, प्रा. तेजस मेहता, प्रा. ऋजुता जोशी आणि प्रा. संतोष मराठे यांचे मार्गदर्शन लाभले. प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे, उपप्राचार्य डॉ. घनश्याम साठे ,सांस्कृतिक विभाग प्रमुख दिपाली नागवेकर यांच्यासह सर्व संचालकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक आणि अभिनंदन केले आहे.