दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स कॉलेजमध्ये ‘शेअर मार्केट मधील करिअर’ या विषयावर मार्गदर्शन पर व्याख्यान संपन्न.
दापोली शिक्षण संस्था संचालित दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स महाविद्यालयाचा कॉमर्स विभाग आणि डायमंड एज्युकेशन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 22 जुलै 2023 रोजी कॉमर्स विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी ‘शेअर मार्केट मधील करिअरच्या संधी या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान’ आयोजित करण्यात आले. याप्रसंगी डायमंड एज्युकेशन संस्थेचे चेअरमन श्री. मयूर मांडले, व्हॉइस चेअरमन श्री. प्रवीण कदम तसेच मार्गदर्शक म्हणून श्री. स्वप्निल जंगम व श्री. जय सुर्वे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाच्या कॉमर्स विभाग प्रमुख प्रा. ज्योती चौगले यांनी मान्यवरांचे स्वागत गुलाब पुष्प देऊन केले. याप्रसंगी डायमंड एज्युकेशनचे चेअरमन श्री मांडले सर यांनी आपले विचार व्यक्त करताना डायमंड एज्युकेशन चा मूळ उद्देश हा फक्त क्लाइंट्स जोडून पैसे कमावणे असा नसून, जनसामान्यांनीही शेअर मार्केट शिकून त्यामध्ये आपले करिअर करून आर्थिक लाभ घ्यावा असा आहे हे स्पष्ट केले. श्री. स्वप्निल सर यांनी विद्यार्थ्यांना शेअर मार्केटची ओळख आणि त्यातील करिअरच्या दृष्टीने असलेल्या संधी याची माहिती अतिशय सोप्या भाषेमध्ये करून दिली. डायमंड एज्युकेशन मध्ये असलेल्या स्वयंसेवकांनी आपले शेअर मार्केट मधील प्रॉफिटचे अनुभव विद्यार्थ्यांसमोर व्यक्त केले. जेणेकरून मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी शेअर मार्केटकडे एक करिअरची संधी म्हणून पहावे आणि डायमंड एज्युकेशन मार्फत दिल्या जाणाऱ्या मोफत शेअर मार्केटच्या प्रशिक्षणामध्ये जास्तीत जास्त सहभाग दर्शवावा.
दापोली अर्बन बँक सिनिअर महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन सतत केले जाते. विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबत प्रत्यक्ष अनुभवजन्य ज्ञान मिळावे यासाठी महाविद्यालय अशा कार्यक्रमांचे आयोजन करून विद्यार्थ्यांना प्रगतीचा मार्ग दाखवत असते. सदर कार्यक्रमाचे आयोजन कॉमर्स विभागप्रमुख प्रा. ज्योती चौगले , प्रा. श्रद्धा खुपटे, प्रा. ऋजुता जोशी ,प्रा.सिद्धी साळगावकर, प्रा. ऋचा दळवी, प्रा. रोहिणी गीते व प्रा.भाग्यश्री राजपूरकर यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली केले होते.