दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स महाविद्यालयात युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न..
दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स महाविद्यालयात युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न
महाराष्ट्र शासनाच्या महिला आणि बालविकास विभाग आयोजित राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम दापोली शिक्षण संस्था संचालित दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स महाविद्यालयाच्या क्रीडा विभाग आणि महिला विकास विभागातर्फे घेण्यात आला. 12जुलै ते 14 जुलै असे तीन दिवस चाललेल्या या कार्यक्रमात पहिल्या दिवशी भारतीय स्त्री संघटनेच्या सदस्य आणि दापोली शिक्षण संस्थेच्या संचालक सौ. आर्या भागवत, सौ. मंजिरी जोशी, दापोली मंडणगड खेड चे महिला बाल विकास संरक्षण अधिकारी श्री. प्रदीप लक्ष्मण पळसमकर, विद्यार्थी निधी ट्रस्ट प्रतिनिधी श्री. मानस गुरव, महिला बालविकास विभागाच्या पर्यवेक्षिका शोभा सावंत असा अधिकारी वर्ग उपस्थित होता. ‘ महिला आणि मुलींवरील हिंसाचार – संकल्पना आणि सद्यस्थिती ‘ या विषयावर भारतीय स्त्री संघटनेच्या सदस्या मंजिरी जोशी यांनी मार्गदर्शन केले. युवतींनी मैत्री करताना आपण कुणाशी मैत्री करतो त्या व्यक्तीची नीट माहिती आपल्याला हवी, आपल्या घरच्यांशी आपण दिवसभरातील सर्व घडामोडींबद्दल बोलले पाहिजे तसेच स्त्री ने स्त्रीला मदत करायची भूमिका ठेवली पाहिजे. योग्य वेळी नकार देणे हेही मुलींना जमले पाहिजे असे त्यांनी समाजातील अनेक चालू उदाहरणे देऊन सांगितले. दुसऱ्या सत्रात दापोली पोलिस स्टेशनच्या पोलिस उपनिरीक्षक ज्योती चव्हाण यांनी सायबर गुन्हे आणि त्यापासून चा बचाव या संबंधी मार्गदर्शन केले. सायबर गुन्ह्यांच्या घटनांपासून वाचण्यासाठी आपले OTP किंवा पासवर्ड किंवा आपले अकाऊंट नंबर कोणालाही देऊ नका, सजग राहा तसेच सायबर क्राईम घडल्यास पोर्टल वरील हेल्पलाईन क्रमांकाशी संपर्क करा असे महत्त्वाचे मुद्दे त्यांनी मांडले. तसेच विद्यार्थिनींच्या शंकांचे सुद्धा निरसन केले. तिसऱ्या सत्रामध्ये आंतरराष्ट्रीय किक बॉक्सिंग प्लेअर डॉ. योगिता खाडे यांनी स्वसंरक्षण या विषयावर मार्गदर्शन केले आणि एखादी अवघड परिस्थिती निर्माण झाल्यास कशी हाताळायची याचे प्रशिक्षणही दिले. यावेळी त्यांनी किक स्पंच ब्लॉक शिकवले आणि मुलींना धैर्याने संकटांना तोंड देण्यासाठी तयार केले. कार्यक्रमात पाहुण्यांचे आभार प्रदर्शन प्रा. सिद्धी साळगावकर यांनी केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे आणि उपप्राचार्य डॉ. जी. बी. साठे यांच्या मार्गदर्शनाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी क्रीडा संचालक सौ. निधी भडवळकर, महिला विकास कक्ष प्रमुख ज्योती चौगले तसेच ओमकार पड्याळ इ. नी मेहेनत घेतली.