दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स कॉलेजच्या मुलींचा संघ कोकण झोन आंतर महाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धेत उपविजेता! महाविद्यालयाच्या शर्वरी पानवलकर हिची आंतरविभागीय स्पर्धेसाठी निवड
मुंबई विद्यापीठाअंतर्गत ‘कोकण झोन आंतर महाविद्यालयीन बुद्धिबळ (मुली) स्पर्धा २०२६-२७’ मध्ये दापोली शिक्षण संस्था संचालित दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाने चमकदार कामगिरी करत द्वितीय स्थान (उपविजेतेपद) पटकावले आहे. ही स्पर्धा ३१ ऑगस्ट २०२६ ते २ सप्टेंबर २०२६ या कालावधीत नवनिर्माण कॉलेज, रत्नागिरी येथे पार पडली.
या स्पर्धेत रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या तीनही जिल्ह्यांतील विविध महाविद्यालयांच्या संघांनी मोठा सहभाग नोंदवला होता. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या बुद्धिबळ लढतींमध्ये महाविद्यालयाच्या खेळाडूंनी उत्कृष्ट रणनीती आणि एकाग्रतेच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांना मात देत हे यश मिळवले. मुलींच्या बुद्धिबळ संघामध्ये शर्वरी पानवलकर, सानिया जैन, सानिया पठाण, सोनाली पडवी, अर्फा जमादार ग्रीष्मा खानविलकर यांचा समावेश होता. विशेष म्हणजे शर्वरी पानवलकर हिची आंतर विभागीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सदर स्पर्धा मुंबई विद्यापीठातर्फे रहेजा कॉलेज सांताक्रूझ येथे दि. 7सप्टेंबर ते 8 सप्टेंबर रोजी होणार आहेत.
संघाला महाविद्यालयाच्या क्रीडा शिक्षिका निधी भडवळकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. घनश्याम साठे तसेच दापोली शिक्षण संस्थेचे चेअरमन प्रसाद करमरकर यांनी विजेत्या खेळाडूंचे आणि क्रीडा मार्गदर्शकांचे विशेष अभिनंदन केले. या यशामुळे दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून सर्व स्तरातून खेळाडूंचे कौतुक होत आहे.

