दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स महाविद्यालयाला आय. एस. ओ. 9001: 2015 मानांकनाचे निरंतरता प्रमाणपत्र प्रदान
दापोली शिक्षण संस्था संचालित दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स महाविद्यालय हे मुंबई विद्यापीठाशी कायम संलग्न असलेल्या कोकणातील प्रमुख महाविद्यालयांपैकी एक आहे. आता या महाविद्यालयाला आय. एस. ओ. 9001:2015 मानांकनाचे निरंतर प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.
2023 साली महाविद्यालयाला ISO 9001: 2015 मानांकन प्रमाणपत्र प्राप्त झाले होते. या सर्टिफिकेशनच्या निरंतर प्रमाणपत्राच्या ऑडिटमध्ये ही पुष्टी करण्यात आली आहे की महाविद्यालयाच्या पदवीपूर्व आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक सेवा मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमानुसार आणि महाराष्ट्र शासन व यु.जी.सी. यांच्या अटी आणि शर्तीनुसार दिल्या जातात आणि प्रणाली आणि प्रक्रिया यांच्या बाबतीत आंतरराष्ट्रीय मानांकन संस्थेच्या ( ISO) मानकांचे पालन करतात.
महाविद्यालयाला अशी ओळख मिळणे ही महाविद्यालयाची गुणवत्तेबाबतची सतत वचनबद्धता आणि प्रभावी गुणवत्ता व्यवस्थापन प्रणालीद्वारे सतत सुधारणा दर्शवते.
महाविद्यालयाने 2024 पासून राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धती स्वीकारली असून अभ्यासाबरोबरच महाविद्यालयाचे विद्यार्थी नेहमी क्रीडा, कला आणि संशोधन यात आघाडीवर असतात.
2024 साली महाविद्यालयाने NAAC ची A श्रेणी प्राप्त केल्यानंतर महाविद्यालयाला ISO मानांकन निरंतरता प्रमाणपत्र प्राप्त झाल्याबद्दल दापोली शिक्षण संस्थेच्या सर्व संचालकांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संदेश जगदाळे, उपप्राचार्य डॉ. घनश्याम साठे, आय. क्यू. ए. सी. समन्वयक आणि या ऑडिटचेही समन्वयक डॉ. राजेंद्र मोरे यांसह सर्व प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
