दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स कॉलेजमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी
दापोली शिक्षण संस्था संचालित दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स कॉलेज, दापोली येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त कॉलेजच्या महिला विकास कक्षातर्फे ‘समता संवाद यात्रा’ या सामाजिक जाणीव जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी ‘समाजबंध’ या समाजसेवी संस्थेचे सत्यशोधक कार्यकर्ते श्री. सचिन आशा सुभाष व शर्वरी सुरेखा अरुण हे समता संवादक म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत जात, धर्म आणि लिंगाधारित समता, सामाजिक विषमता, तसेच दैनंदिन जीवनात मूल्याधारित वर्तनाचे महत्व याविषयी सखोल आणि कृतिशील मार्गदर्शन केले.
समता संवाद यात्रेच्या माध्यमातून कोकणातील शाळा व महाविद्यालयांमध्ये युवक-युवतींसोबत संवाद साधण्याचा उपक्रम राबविला जात असून, समाजपरिवर्तनासाठी वैचारिक जागृती किती आवश्यक आहे यावर त्यांनी भर दिला. कोणतेही प्रबोधन घडवण्यासाठी प्रथम स्वतःशी संघर्ष करावा लागतो, त्यानंतर कुटुंब आणि मग समाजाशी झगडावे लागते, असे सांगत त्यांनी तरुणाईला स्वतःला शारीरिक, वैचारिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा सल्ला दिला. स्वतः सक्षम झाल्यानंतरच जीवनात नवी नाती आणि जबाबदाऱ्या स्वीकाराव्यात, असे मार्गदर्शनही त्यांनी केले.
कार्यक्रमात स्वतःच्या आयुष्यातील अनुभव कथन करत संवादकांनी समता, पुरोगामी विचार आणि विवेकवाद यांचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून सक्रिय सहभाग नोंदवत कार्यक्रम अधिक परिणामकारक केला.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना समता संवाद यात्रेचे प्रतिज्ञापत्र आणि सावित्रीबाई फुले यांचा फोटो देण्यात आला व समतेची प्रतिज्ञा देण्यात आली, ज्यामुळे कार्यक्रमाचा सामाजिक संदेश अधिक ठळकपणे पोहोचला.
या कार्यक्रमाची प्रस्तावना महिला विकास कक्षाच्या प्रमुख डॉ. नंदा जगताप यांनी केली तर आभार प्रदर्शन श्रीमती कीर्ती परचुरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. श्रद्धा खुपटे, राज साळवी आणि ओमकार पड्याळ यांनी विशेष मेहनत घेतली.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना कृतीची जोड देणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण करणारा ठरला, अशी प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली.

