दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स कॉलेजमध्ये डीइएस -इन्स्पायर कॅम्पचे यशस्वी आयोजन
दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीही दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित डीइएस -इन्स्पायर कॅम्पचे आयोजन दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स महाविद्यालयात करण्यात आले. हे शिबिर 18 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर 2025 या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आले.
मूलभूत विज्ञानाची गोडी विद्यार्थ्यांना लागावी, त्यामध्ये उच्च शिक्षण घेऊन संशोधनामध्ये त्यांनी आपले योगदान द्यावे आणि आपल्या देशाच्या प्रगतीमध्ये आपला मोलाचा सहभाग द्यावा या हेतूने दरवर्षी कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञानाच्या विद्यार्थ्यांसाठी दापोली एज्युकेशन सोसायटी आणि दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स महाविद्यालय या शिबिराचे आयोजन करीत असते.
या वर्षी या शिबिराचे उदघाटन ‘योजना इंटरमेडीएट प्रायव्हेट लिमिटेड’ चे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर श्री. अजय मेहता यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दापोली एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन डॉ. प्रसाद करमरकर, सेक्रेटरी डॉ विनोद जोशी, संचालक श्री. रविंद्र कालेकर, संचालक श्री. अशोक जाधव, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे इ. उपस्थित होते.
या शिबिरामध्ये प्रा. पद्मनाभ सरपोतदार यांनी रेडीओ ॲस्ट्रोनोमी या विषयावर सोप्या शब्दात मार्गदर्शन केले.
प्रा.श्राव्या पवार यांनी नेटवर्किंग डिवाईस आणि क्रिप्टोग्राफी हा क्लिष्ट विषय मुलांना समजावून सांगितला.
महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी डॉ. निलेश कोरगावकर यांनी अनलॉकींग फ्यूचर इन केमिस्ट्रि या विषयातून मुलांना करीअर मधले विविध पर्याय सादर केले. डॉ. निवास देसाई यांनी एक्सीडेंटल डिस्कवरी इन लाइफ सायन्सेस या विषयावर व्याख्यान देताना संशोधनाची विद्यार्थ्यांना ओळख करून दिली. डॉ. नंदा जगताप रिप्रोडक्टिव्ह फिजिओलॉजी या विषयावरील व्याख्यानातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर डॉ. श्रीनाथ कवडे यांनी हॅबिटॅट रेस्टोरेशन बायोडायव्हर्सिटी आणि क्लायमेट चेंज या विषयावर प्रबोधनपर मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री. राहुल खोत यांनी चुजिंग द राईट करिअर पॅशन वर्सेस प्रेशर या विषयावर मोलाचे आणि उपयुक्त मार्गदर्शन केले.
या व्याख्यानांबरोबरच दररोज दुपारी विद्यार्थ्यांकडून रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, संगणकशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र इत्यादी विषयांवरच्या विविध प्रयोगांचे प्रात्यक्षिक करून घेण्यात आले.
या शिबिराचा लाभ सुमारे 120 विद्यार्थ्यांनी घेतला आणि शिबिरविषयी समाधान व्यक्त केले.
सदर शिबिराचा समारोप समारंभ 20 सप्टेंबर दुपारी चार वाजता झाला. याप्रसंगी दापोली एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी डॉ. विनोद जोशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे उपस्थित होते.
इन्स्पायर कॅम्प यशस्वी करण्यासाठी इन्स्पायर कॅम्पचे समन्वयक प्रा. दिपाली नागवेकर, प्रा. विश्वेश जोशी, प्रा. अनिरुद्ध सुतार, प्रा.नेत्रांजली महाडिक, प्रा. स्वाती डेपोलकर, प्रा. मेधा भागवत यांनी विशेष प्रयत्न केले.
