दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स महाविद्यालयात रक्षाबंधन रक्षाबंधन कार्यक्रमा निमित्त विद्यार्थ्यांनी केली नशामुक्त राहण्याची प्रतिज्ञा
दापोली शिक्षण संस्था संचालित दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स कॉलेजच्या महिला विकास कक्षातर्फे महाविद्यालयात रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम महिला विकास कक्षाने प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या दापोली शाखेच्या सहयोगातून घेतला.
कार्यक्रमात सुरुवातीला प्रा. श्रद्धा खुपटे यांनी प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या दापोली शाखेकडून आलेल्या विद्या दीदी, सारिका दीदी, प्रसादे दीदी आणि स्नेहा दीदी यांची उपस्थितांना ओळख करून दिली आणि पाहुण्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना महिला विकास कक्षाच्या प्रमुख डॉ. नंदा जगताप यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला.
त्यानंतर विद्या दीदी यांनी प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाची सविस्तर माहिती दिली. हे केंद्र समाजासाठी, विशेषतः महिला आणि मुलांसाठी कसे काम करते, याबाबत त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. रक्षाबंधन हा सण केवळ बहीण-भावाच्या नात्यापुरता मर्यादित नसून, तो आत्म्याचा परमात्म्याशी आणि मानवाचा माणुसकीशी असलेले नाते दृढ करणारा सण आहे, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या सारिका दीदी यांनी मुलांना ध्यान (Meditation) करण्याचे महत्त्व समजावून सांगितले. ध्यान कसे करावे आणि त्याचे दैनंदिन जीवनातील फायदे काय आहेत, याचे प्रात्यक्षिक त्यांनी मुलांना दिले. ध्यान केल्याने एकाग्रता वाढते आणि मन शांत राहते, असा संदेश त्यांनी दिला.
यावेळी सर्व विद्यार्थी आणि कर्मचारी यांना राखी बांधण्यात आली. विद्यार्थ्यांनी सुदृढ जीवन जगावे यासाठी कोणत्याही नशेपासून दूर राहणे आवश्यक आहे. म्हणून ‘नशामुक्त भारत’ या अभियानाअंतर्गत उपस्थितांना व्यसन मुक्तीची प्रतिज्ञा देण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटी श्रीमती कीर्ती परचुरे यांनी सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. विक्रम मासाळ,प्रा. सुजित टेमकर तसेच सूरज बुरटे, राकेश कदम यांसह अनेक विद्यार्थ्यांनी मदत केली.






