दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स महाविद्यालयात विद्यार्थिनींसाठी शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यसंबंधी कार्यशाळा संपन्न.
दापोली शिक्षण संस्था संचालित दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स महाविद्यालयाच्या महिला विकास कक्षातर्फे महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये विद्यार्थिनी आणि महिला कर्मचाऱ्यांसाठी ‘ मासिक पाळी, पीसीओडी आणि मानसिक आरोग्य या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेसाठी माझी सहेली चॅरिटेबल ट्रस्ट चे श्री. सुनील देसाई ,डॉ. सौ. अमृता होन(दापोली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज दापोली),आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्ट आणि महाराष्ट्र शासन यांच्या संवेदना या उपक्रमाच्या सौ. रेणुका वारे, सौ. निशा सावंत, यांचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि सरस्वतीपूजन याने झाली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात महिला विकास कक्षाच्या प्रमुख डॉ. नंदा जगताप यांनी प्रथम मान्यवर पाहुण्यांची ओळख करून दिली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे यांनी पाहुण्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. त्यानंतर डॉ. नंदा जगताप यांनी महिला विकास कक्ष आणि अंतर्गत तक्रार निवारण समिती यांचे महाविद्यालयातील कार्य आणि विविध उपक्रम यांची माहिती सांगितली. त्यानंतर प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे यांनी आपल्या मनोगतामध्ये स्त्रियांनी त्यांचे आरोग्य आणि स्वास्थ्य याबद्दल जागरूकता बाळगण्याची गरज व्यक्त करून महाविद्यालय अशाच जागृतीसाठी विविध कार्यक्रम राबवत असल्याचे सांगितले.
कार्यशाळेत प्रथम डॉ. अमृता होन यांनी मासिक पाळी संबंधी माहिती सांगून पीसीओडी या आजाराची लक्षणे आणि उपाय यासंबंधी प्रेझेंटेशन च्या माध्यमातून मार्गदर्शन केले.
सौ. रेणुका वारे यांनी ‘कमी करू ताण, जीवन जगू छान’ या विषयावरील व्याख्यानामध्ये ताण तणावाचे नियोजन कसे करावे या संबंधीची सूत्रे नमूद केली. मानसिक तणावावर वेळीच समुपदेशन आणि इतर उपाय तज्ञांच्या मदतीने घेऊन पुढील गुंतागुंत टाळावी असे आग्रहाने प्रतिपादन केले.
श्री सुनील देसाई यांनी माझी सहेली चॅरिटेबल ट्रस्ट राबवत असलेल्या विविध उपक्रमांची आणि शिबिरांची माहिती दिली. माझी सहेलीच्या आणखी एक कार्यकर्त्या सौ. निशा सावंत यांनी उपस्थित विद्यार्थिनी आणि महिला कर्मचाऱ्यांना मोफत सॅनिटरी नॅपकिनचे वाटप केले. त्यावेळी त्यांनी हे नॅपकिन आरोग्य सुलभ आणि पर्यावरणपूरक असल्याचे आवर्जून नमूद केले. कार्यकर्ते आभार प्रदर्शन सौ. श्रद्धा खुपटे यांनी केले तर सूत्रसंचालन रितू खामकर या विद्यार्थिनीने केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. विक्रम मासाळ, श्रीमती कीर्ती परचुरे, प्रा. सुजीत टेमकर, प्रा. प्रियांका साळवी तसेच शशी शिंदे, ओंकार पड्याळ, यांसह फराह भारदे या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.





