दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स महाविद्यालयात सुरू होणार मुंबई विद्यापीठाचे विद्यार्थी सहाय्यता केंद्र.
मुंबई विद्यापीठाच्या महाविद्यालयांमध्ये आणि दूरस्थ व ऑनलाइन शिक्षण केंद्राची (सीडीओई) प्रवेशप्रक्रिया सुलभ आणि समस्या विरहित होण्यासाठी विद्यापीठाने जिल्ह्यातील चार महाविद्यालयांशी सामंजस्य करार केला असून त्यामध्ये दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स महाविद्यालयाचा विशेषत्वाने समावेश आहे. या विषयीची माहिती नुकतीच मुंबई विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. लिलाधर बनसोड यांनी दिली.
ज्या विद्यार्थ्यांना काही अडचणींमुळे महाविद्यालयीन शिक्षण औपचारिक पद्धतीने पूर्ण करता येत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी मुंबई विद्यापीठामार्फत दूरस्थ आणि ऑनलाइन शिक्षण केंद्राची(पूर्वीचे आयडॉल आता सीडीओई) पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील विविध अभ्यासक्रमांची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शिकण्याची सुलभता, परवडण्याजोगे शिक्षण शुल्क, युजीसी आणि एआयसीटी मान्यताप्राप्त अभ्यासक्रम ही सीडीओईची वैशिष्ट्ये आहेत.
दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स महाविद्यालयाला विद्यार्थी सहाय्यता केंद्राची मान्यता मिळाल्याने त्याच्या मदतीने विद्यार्थ्यांना सीडीओईच्या सर्व अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुलभता, समुपदेशन, परिचयसत्रे, गृहपाठ, प्रात्यक्षिके आणि प्रकल्प हाती घेणे, सत्र आणि सत्रांत परीक्षा घेणे यासह शैक्षणिक कागदपत्रे, विद्यार्थ्यांना गुणपत्रके आणि पदवी प्रमाणपत्रे उपलब्ध करून देणे इ. कामे या केंद्राच्या माध्यमातून केली जातील. विशेष म्हणजे सीडीओई मार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध अभ्यासक्रमांच्या दुहेरी पदवीसाठीही विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले जाईल. अधिक माहितीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांमध्ये संपर्क साधावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे यांनी केले आहे.
मुंबई विद्यापीठामार्फत या विद्यार्थी सहाय्यता केंद्रासाठी दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स महाविद्यालयाची निवड झाल्याने महाविद्यालयाचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

