दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स महाविद्यालयात उद्बोधन वर्गाचे आयोजन.
दापोली शिक्षण संस्था संचालित दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स महाविद्यालयाच्या स्टाफ आणि स्टुडंट वेल्फेअर समिती तर्फे प्राध्यापक आणि विद्यार्थी यांच्यासाठी उद्बोधन वर्गाचे आयोजन करण्यात आले. या उद्बोधन वर्गासाठी मार्गदर्शक म्हणून MKCL चे मार्गदर्शक आणि माजी मॅनेजिंग डायरेक्टर श्री. विवेक सावंत हे लाभले होते.
महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये झालेल्या या उद्बोधन वर्गात सुरुवातीला संस्थेचे अध्यक्ष डॉ प्रसाद करमरकर यांनी श्री. विवेक सावंत, श्री. उदय पंचपोर, सिनिअर जनरल मॅनेजर, MKCL तसेच समीर पांडे, जॉइंट मॅनेजिंग डायरेक्टर, MKCL यांचे स्वागत केले. त्यानंतर प्राध्यापकांना संबोधित करताना डॉ. सावंत यांनी जुन्या शिकवण्याच्या पद्धती बाजूला करून नवीन पद्धतीचा वापर करून मुलांचा शिक्षणातला उत्साह वाढवण्याचा प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली. केवळ ज्ञान देणे, त्याचे उपयोग सांगणे याच्या पुढे जाऊन विद्यार्थ्यांनी त्या ज्ञानाचे विश्लेषण, नेहमीच्या व्यवहारात संश्लेषण करून निर्णय प्रक्रियेत त्याचा उपयोग केला पाहिजे अशा पद्धतीने शिक्षण देण्याची आवश्यकता प्रतिपादन केली.
विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या उद्बोधन वर्गात त्यांनी कॉर्पोरेट जग कसे आहे त्यात टिकून राहण्यासाठी विद्यार्थ्यांकडे कोणती कौशल्ये विकसित झाली पाहिजेत, कार्पोरेट जगाच्या विद्यार्थ्यांकडून काय अपेक्षा असतात याची चर्चा केली. कृत्रिम बुद्धिमत्तेचा जास्त परिणामकारक वापर कसा करता येईल, त्याच्याशी स्पर्धा करण्यापेक्षा त्याचा वापर करून आपला विकास कसा साधता येईल याबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सिद्धी साळगावकर यांनी केले. तर समितीच्या प्रमुख प्रा. श्राव्या पवार यांनी आभार प्रदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे, उपप्राचार्य डॉ. घनश्याम साठे तसेच सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.