दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स महाविद्यालयाचा बहर युवा महोत्सव उत्साहात संपन्न.
दापोली शिक्षण संस्था संचालित दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स महाविद्यालयाचा बहर युवा महोत्सव उत्साहात संपन्न झाला. या युवा महोत्सवात विविध क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक स्पर्धा, डे सेलिब्रेशन अशा विविध कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी हिरीरीने सहभाग घेतला.
क्रीडा महोत्सवामध्ये कबड्डी, व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि क्रिकेट या खेळांच्या स्पर्धा घेण्यात आल्या. विशेष म्हणजे या सर्व प्रकारात विद्यार्थ्यांबरोबरीने विद्यार्थिनींनी सुद्धा स्पर्धा गाजवल्या. सांस्कृतिक स्पर्धामध्ये रांगोळी, मेहेंदी, पोस्टर मेकिंग छायाचित्रण, व्यंगचित्र स्पर्धा याबरोबरच वक्तृत्व, वादविवाद, कथाकथन अशा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन बक्षिसे जिंकली.
डे सेलिब्रेशन अंतर्गत पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी ‘नो व्हेईकल डे’ साजरा करण्यात आला. या दिवशी विद्यार्थ्यांसह सर्व प्राध्यापक आणि इतर कर्मचारी सार्वजनिक वाहनाचा वापर करून किंवा सायकलने महाविद्यालयात आले. त्या दिवशी स्वच्छ्ता दिवसही असल्याने महाविद्यालय परिसराची सर्वांनी साफ सफाई केली. त्याचबरोबर स्लो सायकलिंगची स्पर्धाही घेण्यात आली.
याव्यिरिक्त सारी डे, ट्रॅडिशनल ड्रेस डे, कॅप डे असे विविध प्रकारचे डेज साजरे करण्यात आले.
पारितोषिक वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून दापोली पोलिस स्टेशनचे पोलिस इन्स्पेक्टर श्री. विवेक अहिरे आणि प्रमुख पाहुणे म्हणून दापोली शिक्षण संस्थेचे संचालक आणि ए. जी. हायस्कूलच्या स्कूल कमिटीचे चेअरमन श्री. रवींद्र कालेकर हे लाभले होते. त्याशिवाय दापोली शिक्षण संस्थेचे विश्वस्त श्री. आनंद करमरकर, डॉ. मोहन शिगवण, श्री. अशोक जाधव हेही यावेळी उपस्थित होते.
‘विद्यार्थ्यांनी शिकत असताना स्मार्ट गोल (ध्येय) ठेवले पाहिजे, आपण पुस्तकातून शिकतो त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला पाहिजे, मनापासून ठरवलं आणि त्यानुसार प्रयत्न केले तर यश नक्कीच मिळेल’ अशा शब्दात श्री. अहिरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
श्री. कालेकर यांनी आपल्या गुणी विद्यार्थ्यांचं अभिनंदन करताना त्यांचे यश असेच उत्तरोत्तर वाढत जावो अशी सदिच्छा व्यक्त केली.
यावेळी महाविद्यालयाचा स्टुडंट ऑफ द इअर म्हणून तृतीय वर्ष वाणिज्य विभागाची नियती बाळू भळगट हिचा तर रिडर ऑफ द इअर या पुरस्काराने तृतीय वर्ष विज्ञानची दीप्ती रमेश लोंढे हिचा मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यावर्षीचा स्पोर्ट्स पर्सन म्हणून विपुल विलास तांडेल या प्रथम वर्ष विज्ञानच्या विद्यार्थ्याचा मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
युवा महोत्सवच्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी ‘रेट्रो बॅक टू 90s’ अशी संकल्पना ठेवण्यात आली होती. त्याला अनुसरून विद्यार्थी-विद्यार्थिनीनी सांस्कृतिक नृत्ये आणि गाणी सादर केली. उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या कार्यक्रमाचा आनंद विद्यार्थ्यांनी लुटला.
संपूर्ण महोत्सवाच्या यशस्वितेसाठी
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे, उपप्राचार्य डॉ. घनश्याम साठे यांच्या मार्गर्शनात युवा महोत्सव समन्वयक डॉ. बापू यमगर तसेच विद्यार्थी प्रतिनिधी, प्राध्यापक आणि इतर कर्मचारी यांनी मेहेनत घेतली.