दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे निवासी शिबिर 10 डिसेंबरपासून
दापोली शिक्षण संस्था संचालित दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे ग्रामीण पुनर्रचना निवासी शिबिर 10 डिसेंबर ते 16 डिसेंबर या कालावधीत निगडे येथे आयोजित केले आहे.
ग्रामसुधारणा आणि श्रमप्रतिष्ठा संवर्धनाबरोबर विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी ह्या शिबिरामध्ये विविध उपक्रम राबवले जाणार आहेत.
सदर शिबिराचे उदघाटन 10 डिसेंबरला सकाळी साडेदहा वाजता डॉ. दीपक हर्डीकर, सहयोगी प्राध्यापक, डॉ. बा. सा. को. कृषी विद्यापीठ आणि श्री. समीर गांधी, विश्वस्त, दापोली शिक्षण संस्था यांच्याहस्ते होईल. या कार्यक्रमाला दापोली शिक्षण संस्थेचे सर्व संचालक, निगडे गावातील श्री खेमदेव विकास मंडळ आणि गव्हे-निगडे ग्रुप ग्राम पंचायतीचे माननीय सरपंच आणि सर्व सदस्य यांची प्रमुख उपस्थिती असेल.
या शिबिरामध्ये 10 डिसेंबर रोजी प्रा. अजिंक्य मुलुख ‘ एन.एस.एस. _ नॉट मी बट यू’ या विषयावर विद्यार्थी आणि गावकऱ्यांशी संवाद साधतील. 11 डिसेंबरला डॉ. राजेंद्र मोरे ‘सेवाभावी संस्था आणि आपण’ या विषयावर व्याख्यान देतील तर बारा तारखेला वाईल्ड लाईफ रेस्कुअर, दापोली या संस्थेचे सुरेश खानविलकर, मिलिंद गोरिवले, तुषार महाडिक, ओम साळवी हे ‘सफर सर्प विश्वाची’ या अंतर्गत साप आणि त्यांच्याविषयीची माहिती प्रात्यक्षिकांसह देतील. तेरा डिसेंबरला डॉ. सुदेश आयरे ‘मिशन ऑफ लाईफ’ या विषयावर विद्यार्थी आणि ग्रामस्थांना मार्गदर्शन करतील तर 14 डिसेंबरला प्रा. संतोष मराठे संवाद कौशल्य कसे वाढवावे या संबंधी माहिती देतील.
15 डिसेंबर रोजी प्रा. कैलास गांधी आणि प्रा. श्रेयस मेहेंदळे ‘घर कवितांचे’ या कार्यक्रमातून विविध कविता आणि त्यांचे रसग्रहण यांचा आनंद उपस्थितांना देतील.
या व्यतिरिक्त दररोज योग आणि व्यायाम श्रमदान, गटचर्चा, कागद काम कार्यशाळा, इंग्लिश संवाद कार्यशाळा, सांस्कृतिक कार्यक्रम, बौद्धिक खेळ इ. कार्यक्रमही असतील.
या शिबिराच्या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. अजिंक्य मुलुख आणि डॉ. मनोज लाड हे विद्यार्थी स्वयंसेवकांसह मेहेनत घेत आहेत. त्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे आणि उपप्राचार्य डॉ. घनश्याम साठे ह्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.