दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स कॉलेज मध्ये निबंध स्पर्धा उत्साहात.
दापोली शिक्षण संस्था संचालित दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स कॉलेजच्या ग्रंथालय आणि मराठी वाङ्मय मंडळातर्फे घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेकरिता ‘नवीन शैक्षणिक धोरण: संधी आणि आव्हाने’; ‘वाचाल तर वाचाल’ तसेच ‘निसर्ग-संवर्धन आणि मी’ हे विषय निबंध लेखनासाठी देण्यात आले होते. या निबंध स्पर्धेत मृणाल उमेश महाकाळ (प्रथम वर्ष – वाणिज्य विभाग); अनुष्का निलेश सकपाळ (प्रथम वर्ष – विज्ञान विभाग); तनवी महादेव सातले (प्रथम वर्ष – वाणिज्य विभाग) ह्या तीन विद्यार्थिनींनी अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावले. तसेच प्राची प्रकाश साळवी (प्रथम वर्ष – वाणिज्य विभाग) व मनीषा रखांगे (प्रथम वर्ष – विज्ञान विभाग) यांना उत्तेजनार्थ पारितोषिक जाहीर झाले आहे.
विद्यार्थ्यांना अभ्यासाव्यतिरिक्त अन्य विषयांची गोडी लागावी, त्यांनी नवीन माहिती मिळवावी व त्यांच्यातली लेखन कला वाढीस लागावी यासाठी हा उपक्रम महाविद्यालयात राबवण्यात आला. त्यासाठी वाचनालयाच्या ग्रंथपाल श्रीमती कीर्ती परचुरे, मराठी वाङ्मय मंडळाच्या प्रमुख प्रा. ऋजुता जोशी, व प्रा. सिद्धी साळगांवकर यांनी विशेष मेहनत घेतली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संदेश जगदाळे आणि उपप्राचार्य डॉक्टर घनश्याम साठे यांनी विजेत्यांचे कौतुक केले.