‘दापोली अर्बनच्या’ श्रुती साखळकरला सुवर्णपदक मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातही साहित्य स्पर्धा प्रकारात कॉलेजचा दबदबा कायम ..
दि. 9 सप्टेंबर रोजी विद्यापीठ विद्यार्थी भवन, चर्चगेट, मुंबई येथे पार पडलेल्या वक्तृत्व- गट अ (मराठी) स्पर्धेच्या अंतिम फेरीत दापोली एज्युकेशन सोसायटीच्या दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स कॉलेज मधील टी.वाय.बी.कॉम. मधील विद्यार्थिनी कु.श्रुती चंद्रशेखर साखळकर हिने सुवर्णपदकाला गवसणी घातली. सदर स्पर्धेचा झोनल राऊंड खेड येथे दि. 25 ऑगस्ट रोजी पार पडला होता. मुंबई विद्यापीठाच्या 12 झोन मधून एकूण 44 विद्यार्थ्यांची निवड अंतिम फेरीसाठी झाली होती. अंतिम फेरीसाठी ‘भारताला ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविण्यामध्ये व विकसित भारताचे स्वप्न साकारण्यामध्ये तरुणाईची भूमिका’ असा विषय होता. या स्पर्धेत उत्तुंग कामगिरी करत श्रुतीने सुवर्णपदक पटकावले. सदर स्पर्धेसाठी तिला महाविद्यालयाचे सांस्कृतिक समन्वयक प्रा.कैलास गांधी, प्रा.संतोष मराठे व साहित्य विभाग समन्वयक प्रा.तेजस मेहता यांचे मार्गदर्शन लाभले. त्याचबरोबर प्रा.स्वाती देपोलकर व प्रा.जान्हवी दिवेकर यांनी संघ समन्वयक म्हणून काम पाहिले.
या कामगिरीबद्दल संस्थेचे चेअरमन डॉ.प्रसाद करमरकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संदेश जगदाळे व उपप्राचार्य डॉ.घनशाम साठे यांनी तिचे अभिनंदन केले.

