आविष्कार रिसर्च कन्वेनशन २०१८ कार्यशाळा
दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेज आयोजित ‘आविष्कार रिसर्च कन्वेनशन २०१८-१९ कार्यशाळा ‘ हा जिल्हास्तरीय मुंबई विद्यापीठाचा कार्यक्रम ८ सप्टेंबर २०१८ रोजी महाविद्यालयाच्या सभागृहात यशस्वीपणे पार पडला. यावेळेस कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दिपाली दिवाण यांनी केले. कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी व शिक्षक प्रतीनिधी उपस्थित होते.
याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण मंडळ विभागाचे अधिकारी श्री. सुनील पाटील, रत्नागिरी आविष्कार स्पर्धेच्या प्रतिनीधी डॉ. मिनाक्षी गुरव, डॉ. रावेरकर व डॉ. सुरेंद्र ठाकुरदेसाई, डॉ. अमित देवोगिरीकर या प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती लाभली. कॉलेजचे प्राचार्य श्री. संदेश जगदाळे व उपप्राचार्य श्री. साठे यांच्या हस्ते पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.
‘ आविष्कार ‘ ही संशोधनास प्रोत्साहन देणारी स्पर्धा असुन विद्यार्थ्यांमध्ये नाविन्याची आवड, संशोधनाची वृत्ती निमार्ण करणे हा या स्पर्धेचा मुख्य हेतु आहे. या स्पर्धेत पदवीपुर्व, पदवीधर, पद्व्युत्तर व शिक्षक यापैकी कोणीही सहभागी होऊ शकतात. ही स्पर्धा अत्यंत व्यापक स्वरुपाची असुन विभागीय, विद्यापीठ, राज्यस्तरीय व देशस्तरीय देखील आहे.
कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात मानव्यविद्या, भाषा, कला विषयावर डॉ. ठाकुरदेसाई सराचे व्याख्यान झाले. संधोधनासाठी विषय निवडणे, त्याची मांडणी, प्रस्तुतीकरण, संशोधन करताना येणाऱ्या अडचणी व स्पर्धेतील परिक्षकांचे दृष्टीकोन याबद्द्ल त्यांनी माहिती सांगितली. ‘संशोधन करताना तुम्हाला काही सिद्ध करायचे नाही आहे तर सिद्ध झालेले स्विकारायचे आहे ‘ असे ही डॉ. ठाकुरदेसाई म्हणाले.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात वाणिज्य, व्यवस्थापन व कायदा याविषयी डॉ. दिपक रावेरकर यांनी माहिती दिली. संशोधन म्हणजे काय व ते कसे करावे याची विस्तृत माहिती त्यांनी उदाहरण व प्रात्यक्षिक दाखवुन विद्यार्थ्यांना समजावली. ‘पोस्ट मार्फत बँकींग ‘ हा नवीन विषय ही त्यांनी मांडला. जीवन हे अनेक संशोधनांमुळे सुखकर झालेलं आहे हे त्यांच्या व्याख्यानातुन जाणवलं.
कार्यक्रमाच्या तिसऱ्या टप्प्यात डॉ. मिनाक्षी गुरव यांनी विज्ञान विषय व आविष्कार स्पर्धेची विस्तृत माहिती विद्यार्थ्यांना दिली. स्पर्धा पात्रता, नियम , विजेत्यांना मिळाणाऱ्या शिष्यवृत्त्या याविषयी त्यांनी सांगितले. आविष्कार स्पर्धेतील विविध अनुभव त्यांनी मुलांना सांगुन स्पर्धेसाठी प्रोत्साहीत केले.
कार्यक्रमाच्या चौथ्या टप्प्यात पशुपालन व कृषीक्षेत्र या विषयावर डॉ. देवोगिरीकर यांनी मार्गदर्शन केले.
‘तुमचा प्रोजेक्ट हा एखादा सामाजिक प्रश्न सोडवणारा असावा ‘ हा त्यांचा संदेश खुप मोलाचा ठरला.
कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या विविध कॉलेज प्रतिनीधींना प्राचार्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजक प्रा. घालमे यांनी कार्यशाळेचा आढावा घेतला व पाहुण्यांना मुमेंटो देऊन पुरस्कृत केले.
शेवटी मुंबई विद्यापीठाचे कार्यकारी अधिकारी श्री. सुनील पाटील यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धेत सहभागी होण्याचे आव्हान केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. घालमे, प्रा. साळवी, डॉ. मोरे, डॉ. मिसाळ, प्रा. मराठे, प्रा. चौघुले यांनी प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली महत्त्वाचे कार्य केले.